एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा एसटीचा ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० प्रदूषणरहित ई-बसेस लवकरच रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावताना दिसतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. यामुळे डिझेलवरील लाखो रुपयांचा खर्च वाचणार असून, प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल.
एसटी महामंडळाने डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेससोबतच सीएनजी बसेसचा वापरही वाढवला आहे. लवकरच रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. यापूर्वीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, या सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किलोमीटरचे अंतर कापतात आणि त्यांची क्षमता २८० किलोमीटर इतकी आहे. ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडून हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील माळनाका आगारात तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही चार्जिंग स्टेशन्स लवकरच उभारली जातील.
एकदा चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले की, या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जातील, असे बोरसे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा कायापालट सुरू झाला आहे.
एसटीमध्ये आता चांगल्या गाड्यांची भर पडत असल्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे कल वाढत असून, उत्पन्नातही वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिवशाही, स्लीपर आणि सिटी बसेस अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.
एमआयडीसीच्या सहकार्याने येथील अनेक बसस्थानके हाय-टेक केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले की, “प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळ आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. लवकरच रत्नागिरीच्या रस्त्यांवर ई-बसेस धावताना दिसतील.”