भालचंद्र कुबल : पाचवा वेद
मागील लेखात घाशीराम कोतवालबाबतचा खराखुरा इतिहास पाहिला. इतिहास हा नाटक, कथा व कादंबऱ्यांसाठी नेहमीच आवडीचा विषय राहिला आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक कपोल कल्पित कथानकांवर तर कथा कादंबऱ्यांचा पिंड पोसला गेलाय. त्यात नाटक हा वाङ्मय प्रकारही मागे नाही. सामाजिक नाटकांनी मराठी प्रेक्षकांना वेढण्याअगोदर ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांची चलती होती. कित्येक नाटके प्रेक्षकांना माहीत असलेल्या पौराणिक अथवा ऐतिहासिक कथांच्या आवृत्त्या असंत. साधारण साठ व सत्तरच्या दशकात याच पौराणिक वा ऐतिहासिक कथांना सामाजिक पातळीवर हाताळताना त्यात वर्तमान नाते संबंधांचे सूर दिसू लागले आणि दर्शकांसाठी लेखकांनी घेतलेला तो “अप्रोच” सुपरहिट ठरला. म्हणजे नाटकाची बैठक ऐतिहासिक किंवा पौराणिक, मात्र आशय सामाजिक. चिं. त्र्यं. खानोलकर, वसंत कानेटकर, गिरीश कर्नाड, रत्नाकर मतकरी, या नव्या दमाच्या लेखकांची नाटके त्यानी अधोरेखित केलेल्या ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रसंगातील पात्रांना वर्तमान भौतिक बैठकीवर आणून बसवले. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक पात्रे ‘नेक्स्ट डोअर कॅरेक्टर्स’ वाटू लागल्याने प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली. रायगडाला जेव्हा जाग येते, एक शून्य बाजीराव, हयवदनसारखी नाटके लेखकांच्या दृष्टिकोनामुळेच सुपरहिट ठरल्याचे आपण अनुभवले होते. अशाच एका नाट्यस्पर्धेसाठी तेंडुलकरांच्या घाशीरामचा जन्म झाला. “घाशीराम कोतवाल”चे कथानक ऐतिहासिक नक्कीच आहे; परंतु तो इतिहास नाही. तेंडुलकरांनी लिहिलेले नाना फडणवीसांचे पात्र हे कपोल कल्पित असावे. इतिहासात वर्णन केले गेलेले नानांचे गुण आणि नाटकातील स्वभाव यांचा विपर्यास तौलनिक अभ्यासात आढळतो. सत्तरच्या दशकात प्रेक्षकांचा रोष ओढावून या नाटकावर प्रतिबंध आणणे अथवा वाळीत टाकण्याचे (बंदी घालणे) वगैरे प्रकार म्हणजे त्या कथानकातील लिहिल्या गेलेल्या पात्रांच्या चारित्र्यकरणाची मोडतोड होती. साडेतीन शहाणे म्हणून गणल्या जाणाऱ्या एका बुद्धीतेजावर उडवले गेलेले विषयासक्त शिंतोडे, पेशवाईचा पगडा मिरवणाऱ्या समाज घटकांना पटणारे नव्हते, म्हणूनच घाशीराम कोतवाल या नाट्याकृतीने ब्राह्मणांचा रोष ओढावून घेतला. हा झाला जातीयतेचा मुद्दा…! परंतु घाशीरामवर बंदी येण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण राजकीय होते.
सत्तरच्या दशकात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना डावे कम्युनिस्ट डोईजड झाले होते. प्रभाकर संझगिरी, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, जॉर्ज फर्नांडीस, श्रीपाद डांगे आदींनी काँग्रेसचा जीव मेटाकुटीला आणला होता. राज्यकर्त्यांना सैरभैर करून सोडले होते. अशा परिस्थितीत १९६६ साली जन्मलेली शिवसेना बाळसं धरू लागली होती. अनेक उद्योगांमधील कामगार युनियन्स शिवसेनेने ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. अशा वेळी डाव्या कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठी वसंतराव नाईकांनी शिवसेनेला राजकीय बळ दिले. तरुण वर्ग बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर आधीच आकृष्ट झाला होता, त्यात नव्या कणखर नेतृत्वावर भाळून डाव्यांचा बिमोड व्हायला फारसा वेळ लागला नाही.
विजय तेंडुलकरांनीच ‘हे सारे कोठून येते’ या पुस्तकात वसंतराव नाईक आणि शिवसेनेबाबत लिहून ठेवलंय, ‘शिवसेनेचा विशेष दरारा होता त्या काळात खासगी बैठकांतून वसंतरावांना शिवसेनेविषयी बोलताना अनेकांनी ऐकले होते. वसंतराव पाइप झटकत म्हणत, ‘तुम्ही त्यांचा उगीच बाऊ करता. वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू शकेन इतका पुरावा माझ्यापाशी आहे.’ पण ही वेळ त्यांच्या कारकीर्दीत कधीच आली नाही किंवा त्यांनी ती आणली नाही. शिवसेनेचा वाघ त्यांनी चांगला सांभाळला. तो कम्युनिस्टांशी डरकाळ्या फोडीत हाणामारीचे मुकाबले करी आणि वसंतरावांचे अंग चाटी.
नेमके हेच तेंडुलकरांनी घाशीराम कोतवालमधे रूपक स्वरुपात मांडले आहे, असा शिवसैनिकांनी समज करून घेतला आणि घाशीरामचे प्रयोग बंद पाडण्यास सुरुवात केली. परदेशी निघालेल्या नाट्यचमूवर हल्ला करून त्यांना थांबवण्याचेही प्रकार घडले. एकंदरीत तेंडुलकरांचे रूपक सादरकर्त्यांच्या अंगाशी आले.
सेक्स (लैंगिकता) आणि व्हायोलन्स (हिंसा किंवा क्रौर्य) यांचा तेंडुलकरांनी सातत्याने नाटकांतून शोध घेतलेला दिसतो. तेंडुलकरांच्या नाटकांतील विषय तुरळक अपवाद वगळता मेटॅफर (रूपक) बनण्याची प्रक्रिया घडते. यामुळे तेंडुलकरांनी मराठी भाषेत लिहिलेली नाटके अखिल भारतीय स्तरावर पोहोचली. भारतीय ठरली. “घाशीराम कोतवाल’ नाटकाचे उदाहरण इथे का घेता येईल तर मुळात घाशीराम हे स्थानिक गोष्टीविषयीचे नाटक आहे. पण ती गोष्ट, त्यातील आशय ‘स्थानिक’ न राहता, त्यात मांडलेला पॉवर गेम किंवा सत्ताखेळ हा कालातीत आणि वैश्विक आहे - जो तेंडुलकर मांडतात. त्यामुळे घाशीराम हे रूपक बनते आणि केवळ मराठीच नव्हे तर भारतीय नाटककार म्हणून तेंडुलकर महत्त्वाचे ठरतात. तेंडुलकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, एखाद्या गोष्टीचे संपूर्ण केंद्रच बदलणे, परिमिती बदलणे, डायमेन्शन पालटणे, हे त्यांच्या नाटकांतून त्यांनी केले आहे, त्यामुळेही ते अखिल भारतीय स्तरावरचे महत्त्वाचे आणि आधुनिक नाटककार या स्थानी आहेत. याचाच आधार घेत मला व अभिजित पानसेला या नाटकाच्या नव्या आवृत्तीचे स्वरूप बदलावेसे वाटले. या आधी मी केलेल्या नाटकात जब्बार पटेलांचा आकृतीबंध मोडून ते अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शैलीत सादरही करून झाले होते, मात्र अभिजित पानसेंच्या वैचारीक बैठकीने एका नव्या सैद्धांतिक समीकरणांचा उदय “घासीराम कोतवाल” च्या निमित्ताने झाला. तो पुढील अंकात...!