
मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत पण महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठविलेल्या हजारो राख्या सुपूर्त करण्याचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानपूर्वक स्वीकारल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे, कालीदास कोळंबकर, अमित साटम, संजय उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुलभा गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. संजय केनेकर, माधवी नाईक, राजेश पांडे, ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे, नीता केळकर, प्रा. वर्षा भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यभरातील बहीणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहीणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही, निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतिक आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहीणींच्या प्रेमाची दखल घेतली. लाडक्या बहीणींच्या मताला व्होट चोरी म्हणणारेच सर्वात मोठे चोर आहेत अशी प्रखर टीका फडणवीस यांनी केली. व्होट चोरी म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे, बुद्धी चोरी गेली आहे. माझ्या लाडक्या बहीणींना विनंती आहे की अशा निर्बुद्धांसाठी २५ टक्के आशीर्वाद मागा जेणे करून त्यांना अक्कल येईल. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात ना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. महाराष्ट्रात जी यांची गत झाली तीच गत बिहारमध्ये होणार आहे. मातृशक्ती मोदीजींच्या पाठीशी आहे. बहीणींची मान अभिमानाने उंचावेल असेच कार्य आम्ही करू. देश, राज्य, समाज हितासाठी काम करू. तुमचे प्रेम आशीर्वाद असेच मिळो, प्रेम मिळाले तर महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवू अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जाऊन दिवसाचे १८ तास केवळ महाराष्ट्र आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न करतो अशा लाखमोलाच्या भावाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखी भेट द्यायला हवी या विचाराने हा राखी प्रदान सोहळा आखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ३६ लाख ७८ हजार राख्या राज्यभरातून आल्या. महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी देवाभाऊंनी अविरत केलेले काम सर्वापर्यंत त्यांच्या भगीनींनी पोहोचवायला हवे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी आ. चित्रा वाघ म्हणाल्या की देवाभाऊंच्या संकल्पनेनुसार महिलांच्या हाताला काम मिळून दाम मिळावे यासाठी महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या. हा देवाभाऊ लाडक्या बहिणींच्या भल्यासाठी नेहमी झटत असतो. असा भाऊ मिळणे म्हणजे भाग्य आहे. यशवंत, किर्तीवंत व्हा या शुभेच्छा त्यांनी दिल्या. जो निर्णय देवाभाऊ घेतील तो निर्णय तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महिला मोर्चाची आहे अशी ग्वाहीही दिली.
यावेळी शेलार म्हणाले की, हा मेळावा भावनिक आणि नाते जपणारा कार्यक्रम आहे. लाडक्या बहिणींची सदैव काळजी करणारा देवाभाऊ आणि त्यांच्या बहिणींचे नाते अनोखे आहे. मुंबई, मराठी वरून राजकारण करणारे आणि देवाभाऊ यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारण करणारी मंडळी आज भावाभावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरातील बहीणीला मतदार म्हणून नाही तर बहीण म्हणून बघणारा भाजपा आहे. त्या बहीणींच्या हितासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य स्तरावर आज आखल्या जात आहेत.
बहीणींच्या आशीर्वादाने २०२९ साली ही आमचेच सरकार येणार बहिणींच्या प्रेमाचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मला लाभली असे नमूद करीत फडणवीस यांनी बहिणींच्या आशीर्वादाने २०२९ मध्येही आमचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात महायुती सरकार महिला सहकारी संस्थांसाठी डेडीकेटेड काम मिळायलाच हवे यासाठी त्यांना हिस्सेदारी व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.