देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निधन
August 23, 2025 03:16 PM 45
मऊ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन झाले. ते मऊ कुशीनगर, उत्तरप्रदेश येथे जात असताना शनिवार २३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी यांचेही निधन झाले. त्रिपाठी यांचा चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रा. हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, नव्यन्याय आणि न्यायशास्त्राचे विद्वान होते. होते. त्यांनी सात जून २०२३ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या काळात त्यांनी विद्यापीठासाठी ७० कोटी रुपयांचे अनुदान मिळवले. तसेच संशोधन प्रकल्प आणि कार्यशाळांसाठीही त्यांनी अनुदान मिळवले. त्यांच्या काळात वारंगा आंतरराष्ट्रीय परिसरातील डॉ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते एक ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याशिवाय संशोधन छात्रावास आणि डॉ. तोतडे सभागृह देखील त्यांच्या काळात पूर्ण झाले. त्यांनी कालच सहा प्राध्यापकांना पदोन्नतीचे पत्र दिले होते.
त्रिपाठी श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरुपदही भूषवले होते. त्यांना भारत सरकारतर्फे महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार आणि पाणिनी सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेने त्यांना विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित केले होते.