Sunday, August 24, 2025

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने

गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज, शनिवारी सिक्कीमच्या गंगटोक येथून अटक केली. त्यांच्यावर बेकायदेशीर ऑनलाइन व ऑफलाइन बेटिंग रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप आहे.

ईडीने वीरेंद्र यांच्याशी संबंधित किमान ३० ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत १२ कोटी रुपये रोख, १ कोटी रुपयांचे परकीय चलन, सुमारे ६ कोटींचे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी आणि ४ उच्चमूल्याची वाहने जप्त करण्यात आली. तसेच १७ बँक खाती व २ लॉकर गोठवण्यात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, वीरेंद्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गंगटोक येथे गेले होते. तिथे एका कॅसिनोसाठी त्यांनी जमीन भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे. ईडीच्या तपासात, ते किंग-५६७, राजा-५६७, पप्पीज ००३ आणि रत्ना गेमिंग सारख्या अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्सचे सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे.तसेच, वीरेंद्र यांचे भाऊ केसी नागराज, केसी थिप्पेस्वामी, आणि मुलगा पृथ्वी एन. राज यांच्याशी संबंधित मालमत्ता आणि दस्तऐवजांचीही चौकशी सुरू आहे. केसी थिप्पेस्वामी आणि पृथ्वी राज हे दुबईहून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीस, आणि प्राईम-९ टेक्नॉलॉजीस या कंपन्यांमार्फत कथित ऑनलाइन गेमिंग व्यवसाय चालवत असल्याची माहिती आहे. या कंपन्यांचा वीरेंद्र यांच्या कॉल सेंटर व गेमिंग नेटवर्कशी थेट संबंध असल्याचा संशय आहे.

अटकेनंतर वीरेंद्र यांना गंगटोक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, गोव्यातही ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्यांच्या नावाशी संबंधित ५ कॅसिनोंवर छापे टाकले. त्यामध्ये पपीज कॅसीनो गोल्ड, ओसीन रिव्हर्स कॅसिनो , पप्पीज कॅसीनो प्राईड, ओसीन ७ कॅसीनो आणि बिग डॅडी कॅसीनो यांचा समावेश होता.केसी वीरेंद्र सध्या कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघाचे आमदार असून, ही कारवाई काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा