मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली असून सामान्य नागरिकांनी तसेच दिव्यांग बांधवांनी याद्वारे घरबसल्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपली सहभागीता नोंदवावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.
मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते एमएसआरडीसी, वांद्रे येथे ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे आणि https://ganeshotsav.pldmka.co.in/ या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे तसेच पत्रकार उपस्थित होते.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आता तालुकास्तरापर्यंत विस्तारित करण्यात आला असून विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पोरितोषिकांच्या रकमांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला रूपये ७.५० लाख तर जिल्हास्तरावरीय प्रथम विजेत्यास रूपये ५० हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना रूपये २५ हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याकरिता प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर, खुल्या गटातून महसूल विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर रील बनविण्याची भव्य स्पर्धा होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची योजना असल्याचे सांगत मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपये यानुसार भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या दरम्यान https://mahaanudan.org या वेबसाईटवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर व्याख्यानमाला, अध्यात्मक नाट्यरंग महोत्सव, ड्रोन शो, टपाल तिकिटे, चौकांचे सुशोभीकरण, विद्युत रोशनाई अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी राज्यातील सर्व जनतेला गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या.