
मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे. हवामान खात्याने ४ सप्टेंबर २०२५ पर्यंतचा राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील पावसाबाबतचा नवा अंदाज जाहीर झाला केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेशोत्सवादरम्यान कोकण विभागात पावसाची शक्यता आहे.
उत्तर कोकण म्हणजे, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत सरासरी २० ते ४० मिलीमीटर पाऊस दररोज पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २८ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण थोडे कमी असेल. त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकण विभागात दररोज सरासरी २० ते ४० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी येथे रविवार २४ ऑगस्ट ते मंगळवार २६ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये २६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघर जिल्ह्यात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. धुळे आणि जळगाव येथे नंदुरबार येथे २४ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. २५ ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ, खान्देशातील जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवार, २४ ऑगस्ट रोजी 'मॅडन ज्युलिअन ऑस्सिलेशन' या घटकाच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन त्याचा वायव्य दिशेकडे प्रवास होईल. यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.