
मुंबई : मुंबई ते मडगाव दरम्यान आतापर्यंत आठ डब्यांची ‘वंदे भारत’ चालवण्यात येत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ही गाडी आता १६ डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होईल. ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेने हा निर्णय घेतल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे .
जून २०२३ मध्ये कोकण रेल्वेवरील आणि गोवा राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशविदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाली. वंदे भारतला अधिक पसंती मिळू लागली. या वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी सुरू होते. प्रवाशांची मागणी अधिक असल्याने, या एक्सप्रेसला १६ किंवा २० डबे जोडण्याची मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर , मध्य रेल्वेने २२२२९/२२२३० क्रमांकाच्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसएमटीहून तर २६, २८ आणि ३० ऑगस्ट रोजी मडगावहून धावेल. ही सुविधा केवळ गणेशोत्सवाच्या विशेष गर्दीच्या कालावधीसाठी असणार आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे .
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटल्यानंतर दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे या गाडीला थांबा असेल. ही वंदे भारत सीएसएमटी येथून पहाटे ५. २५ वाजता सुटेल आणि दुपारी १. १५ वाजता गोव्यातील मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या मार्गावर मडगाव, गोवा येथून दुपारी २. ३५ वाजता सुटेल आणि रात्री १०. २५ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.