Saturday, August 23, 2025

गणपती बाप्पांचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

गणपती बाप्पांचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणारे भाविक करतात तारेवरची कसरत

मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की, कोकणातल्या प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविक सज्ज होतात. पण, बाप्पा कोकणात येण्याआधीच त्यांच्या मूर्तींचा प्रवास सुरू होतो. कोकणात हजारो गणेशमूर्ती मुंबई, ठाणे आणि पुणे अशा ठिकाणांहून पोहोचवल्या जातात. मात्र, या वर्षी गणेशमूर्तींचा हा प्रवास खूपच कष्टदायक ठरत आहे. कारण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे.

महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनाने मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक काही मीटरवर खड्डे असल्याने गाड्या रस्त्यामधील खड्ड्यात आदळत पुढे सरकत आहेत. यामुळे वाहन चालकांसोबतच मूर्ती सुरक्षित पोहोचतील का याची चिंता मूर्ती घडवणारे कारागीर आणि भाविकांना सतावत आहे. एका तासाच्या प्रवासाला पाच-सहा तास - ज्या अंतरासाठी साधारणपणे एक तास लागतो, तिथे आता पाच ते सहा तास लागत आहेत.

त्यातच मूर्तींना तडा जाण्याचा किंवा नुकसान होण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या अगोदर तरी रस्ता नीट करावा, अशी मागणी केली जात आहे. कामाच्या ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते, पावसामुळे झालेली खड्ड्यांची वाढ व नियोजनाचा अभाव या सगळ्यांचा फटका कोकणकरांना व कोकणात जाणाऱ्या भाविकांना बसत आहे.

महामार्गाचे काम १४ वर्षांपासून रखडले 

भक्तांमध्ये नाराजी, सुरक्षिततेची चिंता-दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात येऊन गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. पण सध्याच्या रस्त्याच्या अवस्थेमुळे प्रवासाचा आनंद नष्ट होऊन त्याची जागा भीती आणि त्रास घेत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गणेशभक्त आता एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत की, कोकणचा राजा म्हणजेच गणपती बाप्पा खड्डेमय महामार्गावरून सुखरूपपणे पोहोचावा. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आजवर हजारो कोकणवासीयांचा जीव गेल्याने असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या महामार्गाचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडले आहे.

Comments
Add Comment