Friday, October 24, 2025
Happy Diwali

डायरेक्टर्स ‘अ‍ॅक्टर’

डायरेक्टर्स ‘अ‍ॅक्टर’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 

गोंडस, रुबाबदार असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिकेत विश्वासराव. ‘बेटर - हाफची लव स्टोरी’ हा त्याचा चित्रपट आहे. सूर्याची पिल्ले, दोन वाजून बावीस मिनिटांनी ही त्याची नाटके सुरू आहेत.

अनिकेतचं शालेय शिक्षण बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळी तो क्रिकेट, फुटबॉल खेळायचा. त्यानंतर त्याने विलेपार्लेच्या डहाणूकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. या कॉलेजमधून पुष्कर श्रोती, समीर चौगुले यासारखे कलाकार बाहेर पडले आहेत. तिथे त्याने अनेक एकांकिकेमधून कामे केली. त्यानंतर त्याला ‘नायक’ ही मालिका मिळाली. नंतर नकळत सारे घडले, ऊन-पाऊस या मालिका त्याने केल्या.

‘ऊन-पाऊस’ या मालिकेचे मुख्य दिग्दर्शक संजय सूरकर होते. सतीश राजवाडे एपिसोड दिग्दर्शक होते. दिग्दर्शनामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करीत होते. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. ही मालिका त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली.

त्याने नंतर दैनंदिन मालिकेमध्ये काम करण्याचे थांबविले व त्याचा अभिनयाचा मोर्चा चित्रपटांकडे वळविला. फक्त लढ म्हणा, कर्मयोगी आबासाहेब, बस स्टॉप, चोरीचा मामला, बघतोस काय मुजरा कर, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल्स, नो एन्ट्री पुढे धोका आहे या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. एकाच वेळी मालिका व चित्रपट करणे खूप धावपळीचे होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एकावेळी नाटक व चित्रपट करणे शक्य होते; परंतु मालिका नाही, असे अनिकेत म्हणाला.

‘बेटर-हाफची लव स्टोरी’ हा त्याचा नवीन चित्रपट आहे. प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ या चित्रपटामध्ये घालण्यात आला आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. सुबोध भावेची पत्नी मेल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल होतो. त्याला त्या अवस्थेत आधार देण्याचे काम अनिकेत करीत असतो. त्याला मोटीवेट करीत असतो. सुबोधच्या प्रत्येक सुखदुःखात अनिकेत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय अमर यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकल्याचे अनिकेतने सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक खूप फ्लेक्जीबल होते. अनिकेतने सांगितलेले काही सजेशन दिग्दर्शकाने स्वीकारले. अनिकेतने सांगितले की, तो डायरेक्टर्स अॅक्टर आहे. सुबोध भावे, प्रार्थना बेहरे यांच्यासोबत अगोदर त्याने काम केलेले आहे. रिंकू राजगुरूसोबत त्याने प्रथमच काम केलेले आहे. रिंकू राजगुरू एक गुणी अभिनेत्री असल्याचे त्याने म्हटले आहे. आजच्या पिढीला नवीन काहीतरी हटके बघायचं आहे. या चित्रपटामध्ये सस्पेन्स, भावना आणि चांगले कलाकार याची भट्टी जमून आलेली आहे. या चित्रपटाची कथा घोस्ट कॉमेडी जरी असली तरी एक आगळी-वेगळी प्रेमकथा या चित्रपटांमध्ये गुंफण्यात आलेली आहे. कलाकारांच्या ताकदीमुळे या चित्रपटाची कथा प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आली आहे. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment