
अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याआधी कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते.
त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
यामध्ये येस बँकेनं दिलेल्या 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप असून अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप आहे. याबाबत अनिल अंबानींनी कागदपत्रे देण्यास 10 दिवसांचा वेळ मागितला होता.
दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयकडून आज 6 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अन्य निगडीत ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे की रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी येस बँकेकडून कोणतीही पुरेशी हमी न घेता मोठी कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांद्वारे पैसे इतर कामांवर खर्च केले गेले. यापूर्वी, या प्रकरणात सीबीआयने दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला. सध्या या कारवाई प्रकरणी तपास सुरु आहे.