विविध कारणांनी चर्चेचा ठरला अजित पवारांचा दौरा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकताच विदर्भातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा केला. वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीर्घ काळापासून जी दारूबंदी लावण्यात आली आहे ती उठवावी अशी मागणी केली गेली. मात्र अजितदादांनी वर्धेतील दारूबंदी आम्ही उठवणार नाही, असे ठणकावूनच सांगितले. तर नागपुरात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आम्हाला जिल्ह्यात कोणतेही अधिकारी विचारत नाहीत. पक्षाचे मंत्री येतात आणि पदाधिकाऱ्यांना न भेटताच निघून जातात, अशी तक्रार करताच, दादांनी तुम्ही काम करा म्हणजे सर्वच तुम्हाला विचारतील असे स्पष्ट शब्दांत पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्यातच आपल्या नागपूर भेटीत दादा जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना रुग्णालयात भेटायला गेले. तेव्हा दादांचा दौरा चर्चेचा विषय बनणारच...


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार काल विदर्भात नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा दौरा विविध कारणांनी चर्चेचा विषय बनला आहे. वर्धेत दादा आले होते ते वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण समारंभासाठी. तिथून वर्धेत येत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे बोलताना त्यांनी राज्य सरकारचा महसूल बुडाला तरी चालेल, मात्र वर्धेतील दारूबंदी आम्ही उठवणार नाही, असे ठणकावून सांगितले.


वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही महान नेत्यांचे या जिल्ह्यात दीर्घकाळ वास्तव्य होते. दोघांनीही दारूला विरोध केला होता. त्यामुळेच वर्धा जिल्ह्यात दीर्घ काळापासून दारूबंदी लावण्यात आली आहे. मात्र दारूबंदी असली तरी इथे चोरटी दारू कायम येतच असते. त्यामुळे दारूबंदी ही फक्त कागदावरच आहे असे बोलले जाते. १९८१ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि वर्धेचे खासदार वसंत साठे यांनी घेतलेल्या एका बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक खोत यांनी सांगितले होते की, वर्ध्यात दारूबंदी असली तरी दारूचे परमिट खुलेआम दिले जातात. नागपूरहून वर्धेहून नागपूरला जाणे-येणे हे कोणालाही दिवसातून चारदा करता येते इतक्या सोयीच्या गाड्या आहेत. अनेक परमिटधारक रेल्वेचा पास काढून नागपूरला ये-जा करतात आणि दरवेळी आपल्या परमिटवर दारू घेऊन येत वर्धेत नफा घेऊन विकतात. त्यांना काहीही प्रतिबंध करता येत नाही. त्याचप्रमाणे शेजारच्या चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात चोरटी दारू येते. त्याला आम्ही प्रतिबंध करू शकत नाही. मग या दारूबंदीचा काय उपयोग अशी खंत जिल्हाधिकारी खोत यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. आजही वर्ध्यात तीच परिस्थिती आहे.


ज्या विनोबा भावे यांनी दारूला कायम विरोध केला त्यांच्याच पवनार आश्रमाच्या मागे हातभट्टी चालत असे. विनोबांच्या शेवटच्या आजारात रात्री तिथे मुक्काम करणारे काही शौकिन पत्रकार आणि राजकारणी त्या मागच्या हातभट्टीवर जाऊन आपली इच्छापूर्ती करून आले होते, असे तिथे असणारे पत्रकार आजही सांगतात. आजही असे प्रकार चालतात. आज महात्मा गांधी आणि विनोबा भावे दोघे विस्मृतीत गेले आहेत. परिणामी चोरटी दारू तर येतेच आणि सरकारचा महसूलही बुडतो. त्यामुळे आताही दारूबंदी उठवावी अशी मागणी पुढे येते आहे. मात्र अजितदादांनी ठणकावल्यामुळे मागणी करणारे सध्या तरी शांत झाले आहेत. जर दारूबंदी कायम ठेवायचीच असेल तर अशी चोरटी दारू जिल्ह्यात येणार नाही यासाठी काहीतरी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. वर्धा जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत.


या पाचपैकी तिघांनी अजितदादांच्या या दौऱ्यावर अघोषित बहिष्कार घातला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. आमदार समीर कुणावार आणि राजेश बकाने हे दोघे भाजप आमदार दादांसोबत दौऱ्यात होते. मात्र वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे आणि दादाराव केचे हे दादांनी घेतलेल्या बैठकीला देखील गैरहजर होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये विविध तर्ककुतर्क केले जात होते. याच दौऱ्यात दादांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार हे पुन्हा एकदा स्पष्ट करून टाकले. त्याचप्रमाणे महायुतीत आम्ही एकत्रच लढू हे सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.


नागपुरात येऊन दादांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा संबोधित केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी अनेक तक्रारी मांडल्या. आम्हाला जिल्ह्यात कोणतेही अधिकारी विचारत नाहीत. तसेच पक्षाचे मंत्री येतात आणि पदाधिकाऱ्यांना न भेटताच निघून जातात, इत्यादींबाबत त्यांनी आपले दुखणे सांगितले. त्यावेळी दादांनी तुम्ही काम करा म्हणजे सर्वच तुम्हाला विचारतील अशा स्पष्ट शब्दांत या


पदाधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही स्वतःची कामे घेऊन जाऊ नका, तर लोकांची कामे घेऊन जा, अधिकारी निश्चित तुमचा योग्य तो मान ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच पक्षाच्या नागपुरातील कार्यकर्त्यांचे दादांनी चांगलेच कान टोचल्याचे बोलले जात आहे. आपल्या नागपूर भेटीत दादा जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना रुग्णालयात भेटायला गेले होते. सलिल देशमुख हे शरद पवारांचे निकटवर्ती आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत. ते शरद पवार गटाचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. ते सध्या आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी दादा रुग्णालयात गेल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दादा काही नवीन समीकरण तर जुळवत नाहीत ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. एकंदरीतच अजित पवारांचा नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा विविध कारणांनी चर्चेत राहिलेला आहे हे निश्चित.


- अविनाश पाठक

Comments
Add Comment

उत्तर महाराष्ट्रात नगर परिषद निकालाने भाजप-शिवसेना निकट

धनंजय बोडके नाशिकसह राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एका बाजूला

चक्रव्यूह भेदण्यासाठी...

- आरिफ शेख, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या

पुण्याची सायकल संस्कृती लोप पावते आहे

कधीकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज बदलती जीवनशैली आणि

विवाह पद्धतीतील वळणे

मीनाक्षी जगदाळे । उत्तरार्ध : पुढील बुधवारी विवाह ही भारतीय संस्कृतीतील सामाजिक आणि कौटुंबिक संस्था. तथापि,

महायुतीला साथ, पण विरोधकांनाही हात

दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच या

जखम पायाला अन् औषध शेंडीला

मिलिंद बेंडाळे राज्यात जुन्नर, नाशिक, नगर तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने वाढ होत