Sunday, October 26, 2025
Happy Diwali

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे. मात्र, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भक्ष्य शोधण्यासाठी दिंडोरी फाट्याजवळ आलेल्या बिबट्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवला. चक्क कुत्र्यानेच बिबट्याला फरपटत नेल्याची क्लिप व्हायलर झाल्याने कुत्र्याच्या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

तास दिंडोरी फाट्यालगत कैलास दिनकर गांगुर्डे व योगेश फकिरा गांगुर्डे यांच्या वस्तीवर बिबट्या आला. तेथे दोन कुत्रे बसलेले पाहताच, बिबट्या कुत्र्यांच्या दिशेने चालून आला. कुत्रेही जीव वाचविण्यासाठी बिबट्यावर तुटून पडलेे. कुत्र्यांनी अक्षरश: बिबट्याला फरफटत नेले. परिणामी, जीव वाचवत बिबट्याने पलटी मारत तेथून धूम ठोकली अन् शेजारील मका पिकाच्या शेतात दिसेनासा झाला.

हा सर्व प्रकार वस्तीवरील नागरिकांनी मोबाइलच्या कॅमेर्‍यात कैद केला असला तरी बिबट्याच्या संचाराने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. शेतकरी कैलास गांगुर्डे व योगेश गांगुर्डे यांना रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांचे कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. त्यांना वाटले चोरटे आले असावे. त्यांनी खिडकीतून हळूच पाहिले. परंतु, अंधारात काही दिसेना म्हणून त्यांनी शेजारी त्यांचे चुलत बंधू योगेश यांना आवाज दिला.

परिणामी, हे दोघे चुलत बंधू वस्तीवरील घरातून बाहेर आले. कुत्र्यासमोर बिबट्या त्यांना दिसला. कुत्र्यांचे काही खरे नाही, असा विचार करत असताना कुत्रेही जीव वाचविण्यासाठी बिबट्यावर तुटून पडले. दोन्ही बाजूने दोन कुत्रे आणि मध्ये बिबट्या. तिघेही एकमेकांना लक्ष्य करण्याच्या तयारीत, मात्र वस्तीवरील एका कुत्र्याने क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याचे पुढील पाय पकडत बिबट्याला फरपटत नेले. बिबट्याने पलटी मारत कुत्र्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत शेजारील मक्याच्या शेतात धूम ठोकली. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. परिसरात पिंजरा लावण्याचे निश्चित केले. मात्र, ही घटना परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने नागरिकांनी कुत्र्यांच्या धाडसाचे कौतुक केले अन् त्याचीच चर्चा दिवसभर सुरू राहिली.

Comments
Add Comment