Saturday, August 23, 2025

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता हिंजवडी पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच बेदरकारपणे चालवल्या जाणाऱ्या एका मिक्सर ट्रकने ११ वर्षीय प्रत्यूषा संतोष बोराटे या शाळकरी मुलीचा बळी घेतला होता. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी मिक्सर ट्रकच्या चालकासह मालक आणि सुपरवायझरवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारची ही पहिलीच कारवाई असून यातून बेदरकार वाहन चालवणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हिंजवडी ही आयटी कंपन्यांचे केंद्र असल्याने या भागात अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून या वाहनांच्या बेदरकारपणामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच एका घटनेत, प्रत्यूषा बोराटे या ११ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख याच्यासह मालक प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करत होते. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आणि कठोर कारवाईमुळे भविष्यात असे अपघात टाळण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलीस उपायुक्त सचिन अडसूळ यांनी सांगितले की, "आम्ही यापुढेही अशा घटनांमध्ये केवळ चालकावरच नव्हे, तर बेदरकारपणे वाहन चालवण्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कडक कारवाई करू."

"माझाही जीव घ्या", संतप्त झालेल्या पित्याचा आक्रोश

नुकत्याच झालेल्या अपघातात ११ वर्षीय प्रत्यूषा बोराटेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी या मिक्सर ट्रकवर वेळीच कारवाई केली असती तर आज आपली मुलगी वाचली असती, असे म्हणत त्यांनी थेट बांधकाम व्यावसायिकावरच (बिल्डर) आपल्या मुलीच्या खुनाचा आरोप केला आहे. "तिच्या खुनाला बिल्डर जबाबदार आहे. त्याला पाठिशी घातले जात आहे. माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर माझाही जीव घ्या," अशा शब्दांत प्रत्यूषाच्या वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आता सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, पोलिसांची ही कारवाई खूप उशिरा सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हिंजवडीतील रहिवाशांनी अनेकदा या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र प्रत्येक वेळी दुर्लक्ष झाल्यानेच आज निष्पाप जीव गमवावा लागला, अशी त्यांची भावना आहे. प्रत्यूषाच्या पालकांनी व्यक्त केलेल्या या भावना हिंजवडीतील गंभीर परिस्थिती दर्शवतात. अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीवर वेळीच नियंत्रण आणणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाने आता केवळ कागदी कारवाई न करता, रस्त्यावर उतरून कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

दोषींवर कडक कारवाईची मागणी

या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मिक्सर वाहनाच्या चालकासह मालक आणि सुपरवायझर या तिघांविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी त्या मार्गावर मिक्सर वाहनांना परवानगी नव्हती. तरीही हे वाहन चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर आणण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधितांवर गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ करून अधिक कठोर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, प्रत्यूषाच्या आई-वडिलांनी तीव्र भावना व्यक्त करत म्हटले की, “आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,” अशी आमची ठाम मागणी आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, वाहतूक नियमांचे वारंवार होणारे उल्लंघन आणि त्याकडे होत असलेले दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment