Friday, August 22, 2025

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

नवी दिल्ली : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  यांनी भेट देऊन पाहणी केली.

‘गणेश उत्सव’ हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही  खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून विमला यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.   शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

आर. विमला यांनी ठाण्याचे मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक करताना म्हटले, “या गणेशमूर्ती अतिशय आकर्षक, सुंदर आणि मनोहारी असून त्यातून परंपरा, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम त्यांच्या सृजनशीलतेत दिसून येतो. ”त्याचप्रमाणे, “लालबागचा गणपती आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकृती पाहून मन प्रसन्न झाले. अशा अप्रतिम कलाकृतींमुळे महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि भक्तीभाव दिल्लीकरांना जवळून अनुभवता येतो,”  अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिंदे यांनी आर. विमला यांना ‘ श्री’ ची मूर्ती भेट देऊन स्वागत व सन्मान  केला. मूर्तिकार शिंदे यांच्या कलाकृतींसह अनेक नामवंत मूर्तिकारांच्या मूर्ती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममधील हे प्रदर्शन २७ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. येथे ६ इंचांपासून ते ३ फूट उंचीपर्यंतच्या सुमारे ५०० शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांची किंमत ६०० ते ३०,००० रुपयांपर्यंत आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्यदेखील येथे मिळत आहे.

गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अधिक माहितीसाठी ०११-२३३६३३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा