
मुंबई : सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी पूर्णपणे भरा असे स्पष्ट निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवा साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईच्या यंत्रणांची आढावा बैठक ॲड आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी, एमएसआरडीसी अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, अधिकारी, रेल्वे चे अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक उपस्थित होते.
याबाबत बोलताना ॲड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. रस्त्यांवर, हायवेवर, आतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, आज या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल ८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी खड्डे असून या बैठकीत येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महापालिकेकडून खड्डे भरण्यासाठी वापरले जाणारे ‘मास्टीक तंत्रज्ञान’ वाहतुकीच्या दृष्टीने प्रभावी ठरत असल्याने, झोननिहाय नियुक्त कंत्राटदारांकडून हेच तंत्रज्ञान वापरून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, वाकोला, विक्रोळी, गोरेगाव आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याचे लक्षात घेऊन, एमएसआरडीसीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा महापालिका स्वतः खड्डे भरण्याचे काम हाती घेईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गणपतीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने सर्व कामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश आजच्या बैठकीत दिले.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील तक्रांरीबाबत मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केलेल्या सुचना
- ज्या ठिकाणी रस्त्यांवरील चर भरण्यासाठी कंत्राटदार नेमलेले नव्हते, तेथे त्वरित कंत्राटदार नेमून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
- एच वेस्टमध्ये महापालिका लेबरची संख्या कमी होती ती आयुक्तांनी वाढवून देण्याचा निर्णय केलाय. यामुळे स्वच्छ परिसर राखून डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या रोगांचे वाढते प्रमाण रोखता येईल. यासोबतच चिकित्सा शिबिरेसुद्धा या प्रभागात घेतली जातील.
- एच वेस्ट प्रभागातील काँट्रॅक्ट लेबरची संख्या वाढवण्याबाबत आयुक्तांसोबत बोलून निर्णय केलेला आहे.
- सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत येणारे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स हे कंत्राटदराने पुन्हा साफ करावे असा निर्णय घेतला.
- दत्तक वस्ती योजनेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वाढीव दर मिळण्याबाबत आलेल्या मागणीचा आयुक्तांनी विचार करावा असे निर्देश दिले.
- नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर शाळा, महाविद्यालये आणि रहदारी आहे अशा ठिकाणी त्वरीत स्पीडब्रेकर्स, रंबलर्स लावण्याबाबत निर्णय घेतला.
- एच वेस्ट वॉर्ड मध्ये एई,जेई आणि मुकादम यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्यक्ष नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा यांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने त्यामुळे येत्या १० दिवसांत ही रिक्त पदे भरण्याबाबत निर्देश दिले.
- नागरिकांना एकत्रित वाढीव बिल भरताना अडचणी येत असतील तर ते स्लॅबमध्ये भरता यावेत यासाठी आयुक्तांनी निर्णय करावा असे निर्देश दिले.
- अवैध फेरीवाले, अवैध फुडव्हॅन्स यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
- ज्या ठिकाणी सीग्नल्स नाहीत त्या ठिकाणी सिग्नल्स ऍक्टिवेट करण्याची कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.