
चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत मुलींची नावे मंगला मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या मागील जंगलात शेळ्या चारायला गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या परत आल्या व शेळ्या गोठ्यात बांधल्या. थोड्याच वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना गोठ्याजवळ पडलेल्या अवस्थेत पाहिले.
त्या बेशुद्ध होत्या, धाप लागत होती आणि प्रकृती गंभीर होती. तिने तत्काळ आरडाओरड केली, त्यानंतर गावकरी धावत आले. घरच्यांनी त्यांना आत नेईपर्यंत दोघींनीही प्राण सोडले होते. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत पाटील यांनी पथकासह धाव घेतली व तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही बहिणींचे मृतदेह दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण तपासून पाहिले जाणार आहे. पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत असून पुढील चौकशी सुरू आहे.