
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून धावणाऱ्या या टँकरची गळती मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकाला इशारा दिला.
चालकाने तत्काळ टँकर रस्त्यालगत थांबवला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गळती थांबली. या वेळी परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता, मात्र सुदैवाने तेथे मानवी वस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या टाकीतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढल्याने गॅस ओव्हरफ्लो होऊन वरील पाइपमधून बाहेर येऊ लागला. घटनास्थळी कंपनीचे प्रतिनिधी दाखल झाले आणि त्यांनी उन्हामुळे टँकरचे तापमान वाढल्याने हा ओव्हरफ्लो झाल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर टँकरवर थंड पाणी टाकून तापमान कमी करण्यात आले आणि पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंब्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी वाहतूक कोंडी टाळत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. सदर टँकरची गॅस वाहतूक क्षमता १२ टन असून त्यामध्ये जवळपास ११.७६ टन गॅस भरलेला होता. प्रवासादरम्यान उष्णतेमुळे तापमान वाढून झालेली ही गळती अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. गळतीदरम्यान जर टँकरच्या संपर्कात कोणतीही ज्वलनशील वस्तू आली असती, तर भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती.