कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण आहे. या काळात लाखो नागरिक कोकणात येतात. अशावेळी रेल्वेचे तिकीटदेखील मिळणेही मुश्कील आहे.
कोकणमार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. चिपळूण-पनवेल-चिपळूण या मार्गावर तीन दिवसांसाठी अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांसह भाविकांना मोठा दिलासा आहे.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवांचा समावेश आहे. या रेल्वे २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबरला दोन्ही मार्गांवर धावतील. एलटीटी-सावंतवाडी विशेष सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून रात्री ११.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा. एलटीटी येथे पोहोचेल.