
तत्काळ उपाययोजन करण्याची ग्रामस्थांची मागणी
गौसखान पठाण
सुधागड : पाली-खोपोली महामार्गावरील खड्ड्यांनी सुधागड तालुक्यातील जनतेचे जीवन अक्षरशः संकटात टाकले आहे. प्रवास म्हणजे जीवघेणं आव्हान बनले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींनी आपला जीव गमावला आहे.
रुग्णवाहिका अडखळत आहेत, विद्यार्थी उशिरा पोहोचत आहेत, आणि सामान्य नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. गणेश चतुतर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आजही या मार्गावर खड्ड्यांची अवस्था जशीच्या तशी आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग यांचे ठोस दुर्लक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आहे.
परळी ग्रामपंचायत सदस्य राजेश परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. 'गेल्या कित्येक बैठका, आढावा सभा, विशेष आम सभा झाल्या, पण एमएसआरटीसीचे अधिकारी एकदाही उपस्थित राहिले नाहीत. हे केवळ निष्क्रियता नाही, तर जनतेच्या जिवाशी थट्टा आहे,' असा थेट आरोप त्यांनी केला.
परदेशी यांनी स्पष्ट इशारा दिला की, 'खड्डे तत्काळ दुरुस्त करण्यात आले नाहीत, तर येत्या तीन दिवसांत शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने या खड्ड्यांमध्ये कमळाची फुले लावण्यात येतील. आणि यापुढे एकही अपघात झाला, तर एमएसआरटीसी विरोधात थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल.' ते पुढे म्हणाले, “निवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडतो, पण निवडून आल्यानंतर जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली जाते. आमदार, खासदार याकडे लक्ष देतील का? की खड्ड्यांतच जनतेचा आवाज
गाडला जाणार?' या मार्गावरील खड्ड्यांमुळे केवळ वाहतूकच विस्कळीत झाली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जनतेचा संयम संपत चालला आहे. आता या खड्ड्यांवर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढत असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.