करिअर : सुरेश वांदिले
कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) परीक्षेसाठी सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम असला तरी तो लवचिक आहे. त्यामुळे अमूकच प्रकारचे प्रश्न विचारले जातील असे संभवत नाही. या परीक्षेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांचा विधि शाखेकडील कल जाणून घेण्याकडे असतो. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, गणितीय आणि भाषिक कौशल्य व क्षमतेची चाचणी या परीक्षेद्वारे केली जाते.
एका प्रश्नाच्या उत्तरासाठी एक गुण दिला जातो. चूक उत्तरासाठी ०.२५ गुण कपात केले जातात. याचा अर्थ चार प्रश्नांचे उत्तर चुकल्यास १ गुण कमी होतो.
पुढील विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात - (१) इंग्रजी २२ ते २६ प्रश्न; एकूण प्रश्नाच्या २० टक्के. या विभागात प्रत्येकी ४५० शब्दांचे उतारे दिले जातात. ते एखादा एेतिहासिक संदर्भ असलेले अथवा वैचारिक अथवा ललित साहित्याचे राहू शकतात. हे उतारे पाच ते सात मिनिटांत वाचता येणे अपेक्षित आहे. या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यांचा दर्जा १२ वीचा असतो. उमेदवारांचे वाचन आणि इंग्रजी भाषा कौशल्याची चाचणी घेणारे, हे प्रश्न असतात.
(२) चालू घडामोडींसह सामान्य ज्ञान (करंट अफेअर्स इंक्ल्युडिंग जनरल नॉलेज). यामध्ये २८ ते ३२ प्रश्नांचा समावेश असतो. हे प्रश्न एकूण प्रश्नाच्या २५ टक्के असतात. यात भारत आणि परदेशातील चालू घटना घडामोडी, कला आणि संस्कृती, आंतरराष्ट्रीय व्यवहार, सध्या महत्वाच्या असणाऱ्या ऐतिहासिक बाबींचा समावेश केला जातो.
(३) विधीविषयक तार्किक क्षमता (लिगल रिझनिंग) - या विभागात २८ ते ३२ प्रश्न विचारले जातात. ते एकूण प्रश्नाच्या २५ टक्के असतात. या विभागात प्रत्येकी ४५० शब्दांचे उतारे दिले जातात. हे उतारे एखादी बातमी अथवा वैचारिक साहित्याचे राहू शकतात. या उताऱ्यातील अानुषंगाने विधि विषयक ज्ञानाची सर्वसाधारण चाचणी घेतली जाते. या उताऱ्याच्या पलीकडे विधि विषयक ज्ञानावर प्रश्न विचारले जात नाहीत.
(४) तार्किक विश्लेषण क्षमता (लॉजिकल रिझनिंग) - या विभागात २० ते २६ प्रश्न विचारले जातात. ते एकूण प्रश्नांच्या २० टक्के असतात.
(५) संख्यात्मक कल क्षमता/ तंत्र (क्वांटिटेटिव्ह टेक्निक)- या विभागात ११ ते १४ प्रश्न विचारले जातात. ते एकूण प्रश्नाच्या १० टक्के असतात. यात १० वीच्या अभ्यासक्रमातील गणिताचे प्रश्न विचारले जातात.
खासगी संस्था :
शासकीय विधि शिक्षण संस्थाव्यरित पुढील काही खासगी संस्था, ‘क्लॅट’चे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरतात.
(१) अलायन्स युनिव्हर्सिटी, (२) ॲपिजे युनिव्हर्सिटी, (३) अक्रा जैन युनिव्हर्सिटी झारखंड, (४) एशियन लॉ कॉलेज, (५) गाल्गोटिॲस युनिव्हर्सिटी, (६) फेअरफिल्ड स्कूल ऑफ लॉ, (७) बीएमएल मुंजाल युनिव्हर्सिटी, (८) गीतम युनिव्हर्सिटी, (९) जी. डी. गोयंका युनिव्हर्सिटी, (१०) गोपाल नारायण सिंग युनिव्हर्सिटी, (११) जीएलएस युनिव्हर्सिटी, (१२) गुरु गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी, (१३) आयएमएस युनिसॉन युनिव्हर्सिटी, (१४) इंदौर इंस्टिट्यूट ऑफ लॉ, (१५) निर्मा युनिव्हर्सिटी, (१६) आयएसबीआर लॉ कॉलेज, (१७) आयटीएम युनिव्हर्सिटी, (१८) जागरण लेकसिटी युनिव्हर्सिटी, (१९) लॉयड लॉ कॉलेज, (२०) जेइसीआरसी युनिव्हर्सिटी, (२१) महिंद्रा युनिव्हर्सिटी, (२२) एमजीआरपी युनिव्हर्सिटी, (२३) नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटी, (२४) मोदी युनिव्हर्सिटी, (२५) एनआयएमटी कॉलेज ऑफ लॉ, (२६) आरव्ही युनिव्हर्सिटी, (२७) रॅफेल्स युनिव्हर्सिटी, नीमराना, (२८) क्वांटम युनिव्हर्सिटी रुरुकी, (२९) स्कूल ऑफ लॉ ॲण्ड गर्व्हनन्स, भारतीय इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटी, (३०) एसएआय युनिव्हर्सिटी, चेन्नई, (३१) श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालय, (३२) एसआरएम युनिव्हर्सिटी, दिल्ली(एनसीआर) आणि सोनपत, (३३) आयसीएफआय युनिव्हर्सिटी, रायपूर, (३४) युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियअम ॲण्ड एनर्जी स्टडीज, देहरादून, (३५) उत्तरांचल युनिव्हर्सिटी, (३६) विनायका मिशन लॉ स्कूल.