
मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला यंदापासून अधिकृतपणे “राज्य महोत्सव” म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मानला जाणारा हा उत्सव समाजातील प्रत्येक स्तरातील लोक मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करतात. परंतु, प्रथमच राज्य शासनाच्यावतीने गणेशोत्सव “राज्य महोत्सव” म्हणून साजरा केला जाणार असल्याने या वर्षीचा उत्सव अधिक व्यापक आणि भव्य होणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज महत्त्वाचे निर्देश दिले. त्यांनी सर्व राज्य व केंद्र सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले की, गणेशोत्सवाचा उत्साह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. शेलार यांनी सांगितले की, विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने लोकसहभाग वाढवावा आणि गणेशोत्सव अधिक उत्साहाने व भव्यतेने साजरा करावा. त्याचबरोबर, या उपक्रमांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी समाज माध्यमांवर (Social Media) करून राज्यभरात एकात्मतेचा आणि आनंदाचा संदेश पसरवावा, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
राज्य महोत्सव गणेशोत्सवासाठी भव्य तयारी
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज राज्य तसेच केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), वांद्रे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगरानी, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह राज्य आणि केंद्र शासनातील अनेक महत्त्वाच्या संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई पोलीस आयुक्तालय, मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA), म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ, सीमा शुल्क विभाग, बेस्ट, एमआयडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एचपीसीएल, बीपीसीएल, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय जीवन विमा निगम (LIC), राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF), भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), मुंबई जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अदानी एअरपोर्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य विकास पायाभूत सुविधा महामंडळ, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL), महाजनको, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, टाटा ट्रस्ट, टाटा पॉवर या सर्व संस्थांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. या बैठकीत येत्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने आवश्यक तयारी, विभागांमधील समन्वय आणि लोकसहभाग वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी देशवासीयांसाठी एक मोठी आनंदवार्ता दिली आहे. भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या ...
आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो आज २२ देशांमध्ये साजरा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवात आता राज्य शासनाचा सहभागही वाढला असून, गणेशोत्सव हा सर्व धर्म, जाती आणि भाषांना जोडणारा उत्सव असावा, असे शेलार यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, या काळात तालुका ते राज्यस्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार – युनेस्कोचा दर्जा मिळालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर आधारित कार्यक्रम, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संकल्पना यांसारख्या विषयांवर विशेष उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे शेलार यांनी सांगितले. याशिवाय, घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत यासाठी एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्याचेही निर्देश शेलार यांनी दिले.
गणेशोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे माजी सैनिकांचा सत्कार
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक विभागात विशेष उपक्रम, विविध स्पर्धा, रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यासोबतच “ऑपरेशन सिंदूर” या विशेष उपक्रमाअंतर्गत जिल्हानिहाय माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला जावा. तसेच आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संकल्पना यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खास उपक्रम राबवावेत, असे निर्देश शेलार यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सवाला यंदा राज्य शासनाने “राज्य महोत्सव” हा मान दिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीत नवा आयाम जोडला गेला आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी खास उपक्रम, डिजिटल माध्यमांद्वारे प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारी मान्यता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक पर्व ठरेल, असे प्रतिपादन शेलार यांनी केले.