
बीड: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विलास मस्के असे जखमी समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. त्यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत, कारवाईला सुरुवात केली आहे.
या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे मारहाण करण्यात आली, याबाबत अद्याप काहीच कळू शकलेले नाही. सध्या विलास मस्के यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विलास मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीड मधील वैद्यकीय मदत कक्षात गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. दरम्यान हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी विलास मस्के यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
धारधार शस्त्राने केला वार
हाती आलेल्या माहितीनुसार, बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढले आणि धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.