Friday, August 22, 2025

काँग्रेस खासदाराच्या घरात फूट, दिराचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस खासदाराच्या घरात फूट, दिराचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू (सुरेश) धानोरकर यांचे सख्खे ज्येष्ठ बंधू अनिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह शिउबाठाच्या नऊ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हे पक्षप्रवेश झाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करत असलेल्या सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, गणेश नाईक उपस्थित होते.

अनिल धानोरकर २०१४ ते २०२४ या काळात नगराध्यक्ष होते. याआधी २००८ ते २०१३ या काळात ते भद्रावती नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. ते २०१६ ते २०१९ या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. बाळू धानोरकरांनी २०१९ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी अनिल धानोरकर त्यांच्या प्रचारात सक्रिय होते. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरोरा-भद्रावती मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळीही अनिल धानोरकर काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होते.

बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. पुढे निवडणुकीत प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यावेळीही अनिल धानोरकर त्यांच्या सोबत होते. प्रतिभा धानोरकर लोकसभेला बहुमताने विजयी झाल्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेत काँग्रेसकडून अनिल धानोरकर उमेदवार असतील, अशी चर्चा होती. परंतु, प्रतिभा धानोरकर यांनी बंधू प्रवीण काकडे यांना पाठिंबा दिल्यामुळे धानोरकर कुटुंबात वितुष्ट आले. विधानसभेला काँग्रेसकडून प्रवीण काकडेंना उमेदवारी मिळाली. त्यावेळी अनिल धानोरकरांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. दोघांना मतदारांनी नाकारलं. त्यानंतर धानोरकर कुटुंबात समेट झाली नाही.

कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसचे नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील शिउबाठाचे नेते उपेंद्र पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवक हर्षदा भोईर, बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे, वरोरा-भद्रावतीचे शिवसेना उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, रेखा राजूरकर, लीलाताई ढुमणे, प्रतिभा निमकर, शारदाताई ठवसे आदींचा प्रवेश केलेल्यात समावेश आहे. पालघर जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिउबाठाचे संजय चव्हाण, अमोल पागघरे, मकरंद पाटील, सागर सावंत सिद्धेश्वर उंबरे, सुरेश धोडी, संतोष तरे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment