Thursday, August 21, 2025

ढगफुटीनंतर अश्रूंचा बांध फुटला...

ढगफुटीनंतर अश्रूंचा बांध फुटला...

निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही, याचा प्रत्यय मराठवाड्यात पुन्हा एकदा आला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीनंतर एकाच रात्रीत शेकडो जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. एन. डी. आर. एफ. च्या पथकाने अनेकजणांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतरच बचावकार्य वेगाने सुरू झाले. रात्री जेवण करून झोपलेल्या नागरिकांना सकाळची पहाट पाहता येणार नाही, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पुराच्या पाण्याने गावागावात अतोनात हाल करीत परिसीमाच गाठली. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले.

मराठवाड्यात सतत दोन दिवस सर्वत्र पावसाचा धुमधडाका सुरू होता. पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्ह्यांतील हजारो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेली. अचानक आलेला पाऊस व पुरामुळे गोठ्यात बांधलेली जनावरे देखील वाहून गेली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. २४ तासांनंतर पाच जणांचे मृतदेह सापडले. तर अन्य पाचजण बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या पथकाला पाचारण करावे लागले.त्या पथकालाही पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी बराच वेळ लागला. मराठवाड्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे गोधन पुराच्या पाण्यात हरपले आहे. त्यांना शोधत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहत होते. एकीकडे ढगफुटीने हाल केलेले असताना, ऐन पोळा सण तोंडावर असताना गोधन हरपल्याने शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. दूध देणारी म्हैस तसेच गाय-वासरू, बकरी, कोंबड्या या पाण्यात वाहून गेल्या. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्येही खूप मोठा पाऊस झाला. त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबादजवळ एका चार चाकी वाहनातील तीन महिला व तीन पुरुष पुराच्या पाण्यात वाहून गेले. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा किनवट जवळील पूल पाण्याखाली बुडाल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद होती. मराठवाड्यात खूप मोठा पाऊस झाल्याने कापणीला आलेले सोयाबीन हातचे गेले. सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, हळद व उसाचे मोठे नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे शेतात असलेले पीक नसल्यात जमा झाले.

मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावात खूप मोठा पाऊस झाला. गावात पूर आल्यामुळे पाण्यात वाहून गेलेली ललिताबाई भोसले, भीमाबाई हिराबन मादाळे व गंगाबाई गंगाराम मादाळे या तिघांचा मृत्यू झाला. तसेच सहाजण वाहून गेले होते. त्यापैकी चंद्रकला विठ्ठल शिंदे या ४५ वर्षीय महिलेचे प्रेत दुसऱ्या दिवशी शोध पथकाला आढळले. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प बाधित क्षेत्रात बुडालेल्या गावांमध्ये थेट लष्कराकडून बचावकार्य सुरू होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मुखेड व लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याच्या सीमेवर धडकनाळ येथील पुलावरून चार पुरुष, तीन महिला असलेली कार तसेच एक ऑटो पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यापैकी तीन पुरुषांना पथकामार्फत वाचविण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड जवळील रावणगाव येथे २२५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. तर हसनाळ या गावातून आठजणांना पथकाने सुखरूप बाहेर काढले. तशीच परिस्थिती भासवाडी या गावातील होती. त्या ठिकाणी असलेले २० नागरिक पुरामध्ये अडकले होते. तर मुखेड तालुक्यातील भिंगेली येथील ४० नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करावे लागले. या पथकाला पाचारण केल्यानंतरच प्रत्यक्षात पूरग्रस्तांना वाचविण्यात यश आले. हे पथक वेळेवर आले नसते तर कदाचित मराठवाड्यात मृत्यूचा आकडा खूप मोठा वाढला असता, तालुक्यातील भेंडेगाव संपूर्ण पाण्याखाली वेढले गेले होते. तर दोन गावाला जोडणारा बेरळी पूल वाहून गेल्याने संपूर्ण गावात पाणी शिरले. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजविला होता. यापूर्वी कधीही एवढा मोठा पाऊस पडला नव्हता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. काही ज्येष्ठ नागरिकांनी या पावसाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना असेही सांगितले की, एवढा मोठा पाऊस १९८२ नंतरच पाहावयास मिळाला.

मंत्री गिरीश महाजन यांची भेट

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हसनाळ गावास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. गावातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. मुखेड तालुक्यातील बारा गावांना पाण्याचा वेढा असल्याने त्यांना अनेक ठिकाणी पोहोचता आले नाही. हसनाळ (प.मु.) या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली. गावातील मयत कुटुंबीयांची मंत्री महाजन यांनी भेट घेतली. मराठवाड्यातील अनेक मंत्री एका वर्तमानपत्राच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त लंडनला आहेत. त्यामुळे त्यापैकी कोणीही या पूरग्रस्त भागात हजेरी लावू शकले नाही. सोशल मीडियावर मराठवाड्यातील अनेक नेत्यांविरुद्ध अपशब्द वापरणारे पोस्ट व्हायरल होत आहेत. दि. १८ ऑगस्ट रोजी मुखेड-उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार व एक ऑटोमधील सातजण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील ३ जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले. उर्वरित ४ बेपत्ता झालेल्यांपैकी ३ जणांचे मृतदेह सापडले. एकंदरीत मराठवाड्यात झालेल्या पावसात नांदेड जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले. मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. ज्यांच्या घरातील नागरिक या पावसामुळे मरण पावले त्यांना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत. ढगफुटीचा कहर व त्यानंतर अश्रूंचा बांध फुटल्याने मुखेड तालुक्यावर खूप मोठी शोककळा पसरली.

- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment