
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता ब्रोंको टेस्ट एक मापदंड ठरणार आहे. भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलिकडेच असे दिसून आले आहे की, भारतीय वेगवान गोलंदाज बऱ्याच काळापासून दुखापतींशी झुंजत आहेत. या वर्षी आयपीएलपूर्वी अनेक प्रमुख वेगवान गोलंदाजांना दुखापत झाली होती. आता त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि त्यांना बराच काळ तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे. तर ही चाचणी नेमकी काय आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे ब्रोंको टेस्ट?
भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस आणखी चांगला व्हावा यासाठी बीसीसीआयने रग्बी खेळाडूंसाठी वापरण्यात येणारी ‘ब्रोंको टेस्ट’ क्रिकेटपटूंसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीत २० मीटर, ४० मीटर आणि ६०मीटर धावणे असे टास्क असणार आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनी उच्च पातळीची तंदुरुस्ती राखावी आणि त्यांची एरोबिक क्षमता सुधारावी यासाठी यासाठी ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.
अलीकडील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांची तंदुरुस्ती चिंतेचा विषय होती. मोहम्मद सिराज हा सर्व सामने खेळणारा एकमेव गोलंदाज होता. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांना विश्रांती द्यावी लागली. सराव सत्रादरम्यान अर्शदीप सिंगलाही दुखापत झाली. त्याच वेळी, बुमराहने दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीदरम्यानही गती मंदावली. त्याचा वेग कमी झाला होता. अशा परिस्थितीत, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की, क्रिकेटपटू जिममध्ये जास्त वेळ घालवत आहेत. पण खरे आव्हान मैदानावर सतत धावणे आणि डावामागून डाव टाकणे हे आहे. या चाचणीमुळे वेगवान गोलंदाज दीर्घकाळ थकल्याशिवाय त्यांचा गोलंदाजीचा वेग राखू शकतील याची खात्री होईल.
ब्रोंको चाचणीपूर्वी क्रिकेटपटूंना दोन किलोमीटर धावण्याचा वेळ चाचणीत द्यावा लागत असे. वेगवान गोलंदाजांसाठी निर्धारित बेंचमार्क आठ मिनिटे १५ सेकंद आहे. तर फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकीपटूंसाठी निर्धारित बेंचमार्क आठ मिनिटे ३० सेकंद आहे. म्हणजेच या वेळेच्या मर्यादेत दोन किलोमीटर धावणे ही चाचणी उत्तीर्ण होण्याची अट आहे.
आतापर्यंत भारतीय संघाच्या फिटनेस चाचणीसाठी यो-यो चाचणी महत्त्वाची मानली जात होती. यामध्ये क्रिकेटपटूंना २०-२० मीटर अंतरावर ठेवलेल्या मार्करमध्ये सतत धावावे लागते. प्रत्येक ४० मीटर धावल्यानंतर १० सेकंदांचा ब्रेक असतो आणि वेग हळूहळू वाढतो. भारतीय संघासाठी किमान पातळी १७.१ निश्चित करण्यात आली होती. पण आता ब्रोंको चाचणी आल्यामुळे केवळ वेग किंवा चपळतेवर लक्ष केंद्रित केले जाणार नाही. तर क्रिकेटपटूंच्या लांब अंतरापर्यंत धावण्याच्या क्षमतेवर आणि सहनशक्तीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वेगवान गोलंदाजांसाठी हे विशेषतः कठीण ठरू शकते कारण त्यांना सामन्यात सतत वेगवान धावण्यासोबतच लांब स्पेलसाठी गोलंदाजी करावी लागते. यो-यो चाचणीमध्ये स्प्रिंट फिटनेस मोजला जात होता. तर ब्रोंको चाचणीमध्ये क्रिकेटपटूंची मैदानावर राहण्याची आणि लांब अंतरापर्यंत धावण्याची क्षमता तपासली जाणार आहे.