Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘वराह भगवान‘जयंती राज्यभरात साजरी व्हावी!

‘वराह भगवान‘जयंती राज्यभरात साजरी व्हावी!

मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

मुंबई: वराह देवाचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे, येत्या २५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. राज्यभर हा जयंती उत्सव अधिकृतरीत्या साजरा व्हावा, या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी चार गोष्टींचा विचार व्हावा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात वराह जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जावी यासाठी मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

‘हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे. २५ ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचं धार्मिक तसंच सांस्कृतिक महत्त्व अपार आहे.

वराह भगवानाच्या पूजनानं वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. हिंदू समाजात या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकतरीत्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसंच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य ती अधिसूचना देण्यात यावी’, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी पत्रामध्ये केली आहे.

मंत्री राणे यांच्या मागणीमुळे यंदा वराह भगवान जयंती उत्साहात साजरी हाेणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.

  • २५ ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा.
  • शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.
  • शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत.
  • मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्तीचे आयोजन करण्यात यावे.
Comments
Add Comment