Thursday, August 21, 2025

उत्सव गणेशाचा, ठेवा संस्कृतीचा...

उत्सव गणेशाचा, ठेवा संस्कृतीचा...

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली हे आपण सारे जाणतोच. ब्रिटिशांच्या विरोधात सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

जन्माष्टमी, गोपाळकाला हे सणही सार्वजनिकरीत्या साजरे होऊ लागले. समाज प्रबोधनाद्वारे जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य या उत्सवांद्वारे करण्यात आले. एकेकाळी समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी सुरू केलेले हे सार्वजनिक सण हळूहळू आपल्या संस्कृती व परंपरेची वाट सोडून वेगळेच वळण घेऊ लागले आहेत. गणेश मंडळांमध्ये हळूहळू चढाओढ निर्माण होऊ लागली आहे. पूर्वीच्या काळी सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वजण एकत्र येऊन काम करायचे. गणेशोत्सवामध्ये विविध स्पर्धा घेण्यात यायच्या. रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांमुळे प्रत्येकाच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळायचा. व्यासपीठावर बोलण्याची, नृत्य करण्याची भीड चेपली जायची. एकत्रितपणे प्रसाद, एकत्रितपणे आरत्या व्हायच्या, सामाजिक उपक्रम राबविले जायचे. पण आता काळाच्या ओघात सगळंच बदललं आहे. जशी दहीहंडी उत्सवात उंच मानवी मनोऱ्यांचे थरावर थर रचण्याची जीवघेणी चुरस चालू असते त्याचप्रमाणे गणेशोत्सवात बाप्पाच्या उंचच उंच मूर्तींसाठी सुद्धा चढाओढ सुरू असते. अर्थात काही छोटी-मोठी मंडळे याला अपवाद आहेत म्हणा जी विविध उपक्रम राबवून समाजात जागरूकता निर्माण करतात; परंतु बहुतांशी गोविंदा पथके आणि गणेश मंडळे मात्र समाजप्रबोधन आणि सामाजिक ऐक्यासाठी सुरू झालेल्या या उत्सवांचा मूळ उद्देशच विसरून गेली आहेत. डीजेवर नाचगाणी, मद्य सेवन, जुगार आणि गुंडागर्दीने आजचे सार्वजनिक उत्सव गाजू लागले आहेत. त्यातच आता या उत्सवांना राजकीय नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी उचलून धरल्याने याला आता राजकारणाची किनार लाभली आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल या उत्सवाच्या निमित्ताने नेते, पुढारी करताना दिसतात. गणेशमूर्ती, सजावट, प्रसाद, तसेच इतर संबंधित वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक व्यवहार होतो. यामुळे, या उत्सवाचे बाजारीकरण वाढले आहे. काही वेळा या बाजारीकरणामुळे सामाजिक आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचते. कुठेतरी हे सगळं थांबवायला हवे. या उत्सवांचे धार्मिक विचार, त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. आपला हा सांस्कृतिक ठेवा आपल्यालाच जपायला हवा तरच आपली परंपरा आणि आपल्या संस्कृतीची बीजे आपण आपल्या पुढच्या पिढीच्या मनात रुजवू शकू.

उत्सवांचे बाजारीकरण कमी करण्यासाठी, समाजात जनजागृती करणे आणि उत्सवांचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. गणेशोत्सवात पर्यावरणाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आतिषबाजीमुळे होणारे प्रदूषण देखील तितकेच घातक होत चालले आहे. त्याला देखील आवर घालायला हवा. पुढील पिढीला आपला सांस्कृतिक वारसा देण्यासाठी या उत्सवांच्या बाजारीकरणाच्या जाळ्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढावे लागेल. समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय ऐक्यासाठी सुरू झालेले हे गणेशोत्सव चुकीच्या दिशेने जाता कामा नये. चौदा विद्यांचा अधिपती असलेल्या या गणेशाच्या उत्सवाचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यातले बाजारीकरण व राजकारण थांबवायला पाहिजे. तसेच या उत्सवाच्या धार्मिक भावना जपून सांस्कृतिक परंपरेचे जतन केले पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्रातील सर्व छोट्या मोठ्या मंडळांनी एकत्र येऊन ही भूमिका पार पाडली पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाले उत्सवांची सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक उत्सवांतून नवीन युवा पिढी घडवायला हवी. यातला हरवत चाललेला सांस्कृतिक ठेवा आणि परंपरेशी माणसांना जोडून ठेवणारी नाळ ही आपणच जपायला हवी...!

Comments
Add Comment