Thursday, August 21, 2025

Pune Velhe Taluka : ऐतिहासिक निर्णय! पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर केंद्राचा शिक्का, काय असणार नवं नाव?

Pune Velhe Taluka : ऐतिहासिक निर्णय! पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर केंद्राचा शिक्का, काय असणार नवं नाव?

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला (Velhe Taluka) आता नवं नाव मिळालं आहे. वेल्हे तालुका अधिकृतपणे ‘राजगड तालुका’ म्हणून ओळखला जाणार आहे. या नावबदलाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्याने ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांच्या इतिहासात महत्वाचं स्थान असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका वसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर नाव बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतींकडून सातत्याने होत होती. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. तालुक्यातील ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेनं याला मंजुरी दिली होती. महसूल विभागानेही ठरावावर शिक्कामोर्तब करत राजपत्र प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका इतिहासाशी जोडला जात असून, ‘राजगड तालुका’ या नव्या नावाने महाराष्ट्राच्या प्रशासनिक नकाशावर नवी नोंद होणार आहे.

वेल्हे तालुक्याला मिळालं ऐतिहासिक ‘राजगड’ नाव

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याला अखेर इतिहासाशी जोडलेलं नवं नाव मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षं स्वराज्याची राजधानी म्हणून जपलेला राजगड किल्ला, तोरणा यांसारखे दुर्ग या तालुक्यात असल्याने, या भागाला ‘राजगड तालुका’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिक ही मागणी सातत्याने करत होते. अखेर या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्याने स्थानिकांच्या भावनांना दिलासा मिळाला आहे. राजगड किल्ला स्वराज्याच्या इतिहासातील पहिली राजधानी असल्याने या तालुक्याला मिळालेलं नवं नाव अधिक गौरवशाली मानलं जात आहे.

७० ग्रामपंचायतींचा ठराव सफल

वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्याच्या मागणीला अखेर केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. या निर्णयासाठी ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी सकारात्मक ठराव मंजूर केले होते. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेतही या बदलाला हिरवा कंदील देण्यात आला होता. पुढे पुणे विभागीय आयुक्तांनी ५ मे २०२२ रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. आता केंद्र सरकारने देखील ‘राजगड’ नावाला औपचारिक मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. यामुळे इतिहासाशी निगडित मागणी पूर्ण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >