Thursday, August 21, 2025

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील ७ दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत SMS च्या माध्यमातून पोहचवण्यात आले आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून (INCOIS) ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना दि.२० ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत ३.० ते ३.७ मीटर तसेच, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला दि.२० ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत २.७ ते ३.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व रायगड जिल्ह्यातील अंबा, ठाणे जिल्ह्यातील काळू नदीने इशारा पातळी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी मौजे पडळघर, संभाव्य दरड प्रवण धोका असल्याने येथील ९ कुटुंब व रामनगर येथील २ कुटुंब अशी एकुण ११ कुटुंबे लवासा सिटी येथे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील ता. आंबेगाव मौजे घोडेगाव येथील घोडनदी काठी ५ व्यक्ती अडकले असता आपदा मित्रांनी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. पुणे जिल्ह्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय येथील शिवणे नांदेडसिटी रस्ते, भिडे पुल रस्ते, रजपूत झोपडपट्टी ते मनपा मुख्यालय रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांच्या कंपनी मार्फत स्थलांतरित शिबिरात चिकीत्त्सा शिबीर लावले व ३८२ स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली असून प्रशासनातर्फे आपत्ती नंतरच्या कामांना गती देण्याबाबत सूचित केले आहे.

अलमट्टी धरणाच्या विसर्गावर लक्ष

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून अलमट्टी धरणाच्या विसर्ग, (250000 क्युसेक्स) व येवा तसेच धरणाची पाणी पातळी व सांगली, कोल्हापूर, सातारा (ता. कराड) जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचण्याची स्थिती यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अलमट्टी धरणातील पाणी साठ्यामुळे फुगवटा तयार होऊ नये यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. कोयना धरणातून ९३००० क्युसेक्स वरुन ८०००० क्युसेक्स, वारणा धरणातून ३८००० क्युसेक्स वरुण १३७०० क्युसेक्स एवढा विसर्ग कमी करून कृष्णा नदीवरील इतर धरणातून सुद्धा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणातून २८६० क्युसेक्स एवढा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला असून पंचगंगा नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे. नागरिकांचे आवश्यक स्थलांतर करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या आयर्विन पूल सांगली येथे कृष्णा नदीने धोका पातळी पार केली असून, विसर्ग कमी केल्याने सांगली जिल्ह्यातील पाणी फुगवटा आज दुपार पासून ओसरण्यास सुरुवात होईल. सांगली जिल्ह्यातील राज्यमार्ग ०७, प्रमुख जिल्हा मार्ग-१५, ग्रामीण मार्ग - ०८, इतर जिल्हा मार्ग ०१ इत्यादी रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. उजणी धरण १०० टक्के भरल्याने १३०००० क्युसेक्स एवढा जास्तीचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला असून भीमा नदी काठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकानी पाणी फुगवटा झालेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील नवजा-कोयनानगर पाबळनाला रस्ता खचल्याने आणि निसरे ते मारुल हवेली पूलावर पाणी वाहत असल्याने वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Comments
Add Comment