Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास मिटली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ९०.१६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यांचा समावेश आहे. यातील काही तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, इतरांमध्येही पाणी पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या चांगल्या पाणीसाठ्यामुळे महानगरपालिकेला सध्या सुरू असलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेता आला आहे. तानसा आणि विहार तलाव जवळपास पूर्ण भरले आहेत, त्यांची पातळी अनुक्रमे ९९.८% आणि १००% पेक्षा जास्त झाली आहे. मोडक सागर ९१.७% भरला आहे, तर भातसा ९०.८% पर्यंत पोहोचला आहे. मध्य वैतरणा ९७.८% आणि अप्पर वैतरणा ८८% भरला आहे. सर्वात लहान तलाव असलेल्या तुळशीने देखील १००% पातळी गाठली आहे.

Comments
Add Comment