
मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक अशी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कपातीविना किमान ३५८ दिवसांपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे.
भातसाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात ६,६८,२०१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २,०७,७६० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मध्य वैतरणाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,९०,९९३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मोडकसागरची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तानसाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,४५,०८० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तुळशीची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात ८०४६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. विहारची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २७,६९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे.
मुंबईकरांना महापालिकेकडून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नियोजनाचा विचार करता सध्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत वर्षभरासाठी चिंतामुक्त झाले आहेत.