Thursday, August 21, 2025

J&K Accident : वैष्णोदेवी यात्रेला निघालेली बस ३० फूट खोल दरीत कोसळली, एकाच जागीच मृत्यू अन्...

J&K Accident : वैष्णोदेवी यात्रेला निघालेली बस ३० फूट खोल दरीत कोसळली, एकाच जागीच मृत्यू अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. सांबा जिल्ह्यातील जटवाल परिसरात प्रवासी बस नियंत्रण सुटल्याने थेट खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४० पेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी बस कठुआ येथून पवित्र कटरा शहराकडे भाविकांना घेऊन निघाली होती. प्रवासादरम्यान अचानक चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले, तर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

टायर फुटून बस ३० फूट खोल दरीत

सांबा जिल्ह्यातील जटवाल परिसरात प्रवासी बसचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटताच बस महामार्गावरून खाली घसरली आणि थेट पुलाखालच्या ३० फूट खोल कोरड्या कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी कटरा येथे जात असताना ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे.

अपघाताबद्दल तीव्र दुःख, मदतीचे आश्वासन : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जटवाल परिसरातील बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. माता वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांवर ही दुर्घटना ओढवल्याने त्यांनी संवेदना व्यक्त करताना म्हटले की, “या अपघातामुळे झालेली जीवितहानी अतिशय दुर्दैवी आहे.” मुख्यमंत्र्यांनी जखमी यात्रेकरूंच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारच्या वतीने मदत आणि उपचारासाठी पूर्णपणे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अपघातग्रस्तांना स्थानिकांचा जीव वाचविण्यासाठी धडपड

जम्मू-पठाणकोट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्यात सहभाग घेतला. घटनास्थळी प्रथम पोहोचलेल्या लोकांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. प्रवाशांमध्ये मुले आणि महिलांचाही समावेश असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होती. स्थानिकांनी धाडस दाखवत अडकलेल्यांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment