
नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, तसेच पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. तसेच आशिया चषक आणि आयसीसी सारख्या अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांबद्दलची भूमिकाही केंद्र सरकारनं स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धा त्रयस्थ देशांत खेळवल्या जात असल्यास त्यात भारत सहभागी होऊ शकेल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे.
त्यामुळे येत्या आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. थोडक्यात काय तर, भारताने आपल्या धोरणात कोणताही बदल केलेला नाही. आशिया चषक स्पर्धेत अनेक देशांचा सहभाग असतो. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत उतरेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना केवळ आशिया चषक किंवा आयसीसी स्पर्धांमध्येच दिसेल, ही बाब स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानचे संघ आणि खेळाडू सहभागी होत असलेल्या स्पर्धांमध्ये भारताचे संघ आणि खेळाडू सहभागी होतील. भारतात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघ आणि खेळाडूंना सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती क्रीडा मंत्रालयातील अधिकाऱ्यानं दिली.
आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटले आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असे म्हटले आहे. जर केवळ दोनच देशांमध्ये क्रिकेट सामन्यांची स्पर्धा असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोधच असता असंही केंद्राने म्हटलं आहे.
पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले. त्याशिवाय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेत आशियातील अनेक देश सहभागी होत असल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.