बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा मेगा प्रकल्प निमा औद्योगिक संघटनेच्या प्रयत्नाने नाशिकमध्ये उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच उद्योगमंत्र्यांनी केली. सुमारे ३०० एकर क्षेत्रावर प्रकल्पाचा पहिला टप्पा उभारला जाणार असून, त्यासाठी आवश्यक जागा देखील निश्चित करण्यात आल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा उद्योग आल्यानंतर दोन दशकांपासून नवीन उद्योग किंवा उद्योग विस्तारीकरणाची प्रतीक्षा संपणार आहे.
मुंबई, पुण्यानंतर नाशिक हे नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून झपाट्याने नावारूपास येत आहे. मंत्रभूमी ते तंत्रभूमीकडे नाशिकचा विकास जलदगतीने होत आहे. शहराचा चारही बाजूंनी विस्तार होत आहे. वाईनबरोबरच नाशिक आता हॉस्पिटल आणि क्षैक्षणिक कॅपिटल म्हणून पुढे येत आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरांवरील शैक्षणिक संस्थादेखील नाशिकमध्ये आल्या आहेत. सर्वच प्रकारच्या विद्याशाखा असलेली महाविद्यालये नाशिकमध्ये आहेत. परिणामी, सर्वांनाच नाशिकविषयी आकर्षण वाढले आहे. अशा सर्व सुविधा असतानाही दोन दशकांपासून नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग समूह आलेला नाही, अथवा मोठ्या उद्योग समूहाचा विस्तारदेखील झालेला नाही. त्यासाठी मागील काळातील राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कामगार संघटनांबाबत झालेले गैरसमज, कंपनी व्यवस्थापन आणि काही कामगार संघटनांतील वाद, जमिनीची अनुपलब्धता अशी अनेक कारणे आहेत; परंतु काही वर्षांपासून प्रशासन, लोकप्रतिनिधी, औद्योगिक संघटनादेखील उद्योगाच्या विकासासाठी विशेष असे प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये पोषक हवामान, पाण्याची उपलब्धता, कुशल आणि अकुशल मनुष्यबळ आदी बाबींमुळे उद्योगांसाठी या जमेच्या बाजू आहेत. एमआयडीसीने दिंडोरीतील अक्राळे येथे औद्योगिक वसाहत विकसित केली आहे. त्याठिकाणी छोटे-मोठे आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग समूह येत आहेत. काही कंपन्यांचे बांधकामदेखील प्रगतिपथावर आहे.
औद्योगिक विकासासाठी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थात निमा सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहे. निमा संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन देखील सातत्याने करण्यात येत आहे. नाशिकसह मुंबई आणि दिल्ली दरबारी निमाचे पदाधिकारी नाशिकच्या उद्योजकतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करत असतात. निमा सभागृहात काही दिवसांपूर्वी आयोजित संवाद बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महिंद्राच्या जागा वाटप प्रक्रियेचे पत्र निमा अध्यक्ष आशीष नहार यांना औपचारिकपणे सुपूर्त केले. महिंद्रा कंपनीने ५०० एकर जागेची मागणी केली होती, मात्र पहिल्या टप्प्यात ३०० एकर जागेवर प्रकल्प उभारणार आहे. या जागेच्या वाटपामुळे कोणत्याही सध्याच्या उद्योगधंद्यांना नुकसान होणार नाही. उलट हा प्रकल्प साकारल्यानंतर या कंपनीला छोटे पार्ट्स पुरविण्यासाठी वेंडर देखील मोठ्या संख्येने निर्माण होतील. परिणामी या प्रकल्पासह या वेंडरमध्ये देखील रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. निमा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पंचसूत्री संकल्पांपैकी ‘मेगा प्रोजेक्ट’ आणण्याचा संकल्प यानिमित्ताने लवकरच पूर्ण होणार आहे.
कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राचा प्रश्न मार्गी लागणार
तपोवन येथे भिंत नसलेले एक स्थायी प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे उद्योग विभागाने स्पष्ट केले. या केंद्राचा वापर ११ वर्षे उद्योगांसाठी आणि प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळ्यासाठी केला जाणार आहे. सध्या टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मनपाकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औद्योगिक, कामगार संघटनांमध्ये बैठक
काही महिन्यांपूर्वीच निमा आणि सीटू संघटना यांच्यात झालेल्या बैठकीमुळे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न आणि तंटे सामोपचाराने आणि सौहार्दाच्या वातावरणात सोडविणार, तसेच नवीन उद्योग समूह नाशिकला येण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू, असे दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जाहीर देखील केले होते. त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू आहेत. त्याचबरोबर निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबरसह इतर उद्योग संघटनांचा सुरू असलेला पाठपुरावा आणि घेत असलेले विविध उपक्रम या सर्वांचा परिणाम म्हणून नाशिक उद्योगात विकासाचे ध्येय नक्कीच गाठेल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
- धनंजय बोडके