कणकवली: कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारा नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारीच्या अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज अचानक धाड टाकली. या धाडीनंतर मंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर ठिकाणी कणकवली पोलिसाची कुमक तात्काळ दाखल झाली, आणि त्यांनी अड्ड्यावरील ११ लोकांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या एकूण आरोपींकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व मटका अड्डे बंद करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर काही काळ हा व्यवसाय थांबला होता. परंतु अलीकडेच पुन्हा सुरू झालेल्या मटका जुगाराच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी स्वतःच कारवाई करत पोलिस प्रशासनालाही धास्तावून सोडले. या कारवाईमुळे जिल्हयातील अवैध व्यवसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.