Thursday, August 21, 2025

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा कलाकृतींच्या यादीतील ‘घरत गणपती’ हा चित्रपट म्हणता येईल. या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्टपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आहे.

याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले की, ‘अनेकदा प्रेक्षक ‘घरत गणपती’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला कधी मिळणार? असे विचारत होते. गणरायाच्या आशीर्वादाने त्यांची ही इच्छा पूर्ण करता येतेय याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक वेगळी मजा आहे. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ’ पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने आलेल्या 'घरत गणपती' या भव्य मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Comments
Add Comment