
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना
अलिबाग : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्या पत्राच्या अनुषंगाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र.४८) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील यापुर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे तसेच सद्यस्थितीत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना व जनतेच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावरुन जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.
महाड-भोर हा मार्ग एक जूनपासून ३१ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरता पूर्णतः बंद करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हा मार्ग ३१ सप्टेंबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहील, असे सांगण्यात आले आहे.
या कालावधीत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यास हा मार्ग बंद करावा भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट अथवा ऑरेंज दिला नसल्यास सदरचा घाट मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अतिवृष्टी व दरड कोसळल्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊन जीवित हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन या काळात हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या दरम्यान नागरिकांनी व पर्यटकांनी पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर तामिळी घाट मुळशी पिरंगुट पुणे व कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई, सातारा, कराड या मार्गाचा अवलंब करावा, असे निर्देशित केले आहे.