गणेशोत्सवासाठी सुटणार ५ हजारांहून अधिक एसटी बसेस
स्वप्नील पाटील
पेण : आषाढी एकादशी आणि राखी पौर्णिमेच्या यशस्वी कामगिरीनंतर आता गणेशोत्सवासाठी देखील राज्याचे एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी एसटी महामंडळाने ५ हजारांहून अधिक फेऱ्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये ५ हजार गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार असल्याने प्रवाशांमधून समाधानाचे सुरू ऐकायला मिळत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून जरी असला तरी एसटी महामंडळाने २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत चार दिवसांत पाच हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्यांसाठी गाड्या तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये आधीच मुंबईमधून १५००, पालघर मधून ५०० तर ठाणे येथून २००० हून अधिक असे एकूण ४ हजार ग्रुपिंग बुकिंग एसटी महामंडळाकडे झाले आहे. तर ७०० हून अधिक गाड्या या गणेशोत्सव काळातील कोकणवासीयांसाठी इतर प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात आल्या.
तर रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी देखील रायगड एसटी महामंडळ पनवेलहून इतर गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती रायगड विभाग कार्यालयातून मिळाली आहे. एकंदरीत एसटी महामंडळ गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
कोकणवासीय गणेशभक्तांसाठी नियोजित एसटी बसेस
मुंबई ग्रुप बुकिंग १५३६ एसटी फेऱ्या - २६७ एकूण फेऱ्या - १८०३
पालघर ग्रुप बुकिंग ५३५ एसटी फेऱ्या - ७५ एकूण फेऱ्या - ६१०
ठाणे ग्रुप बुकिंग २१२२ एसटी फेऱ्या - ४३५ एकूण फेऱ्या - २५५७
एकूण ग्रुपिंग फेऱ्या ४१९२ एकूण इतर फेऱ्या - ७७७ एकूण फेऱ्या - ४९७०