
मुंबई : मुंबई तसेच कोकणाला पावसाने झोडपल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याची पाण्याची पातळी ४२ फूट ८ इंट आहे. तसेच जिल्ह्यातील ७९ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत पावसाने मुंबई, कोकणला चांगलेच झोडपले होते. या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरात प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले जात आहे.
पंढरपूरमध्ये पूरपरिस्थिती
दुसरीकडे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पात्रात शिरल्याने जवळील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर
सांगली जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. तेथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर पोहोचली आहे.