Thursday, August 21, 2025

अभिनेता विजय राजकीय रणांगणात! स्वबळावर आगामी निवडणूक लढण्याची केली घोषणा

अभिनेता विजय राजकीय रणांगणात! स्वबळावर आगामी निवडणूक लढण्याची केली घोषणा

चेन्नई: अभिनेता विजय यांनी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मदुराई येथे झालेल्या तमिलगा वेंट्री कझगमच्या दुसऱ्या राज्यस्तरीय बैठकीत विजयने भाजपा आणि डिएमकेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. सोबतच त्यांचा पक्ष युतीत गुलामी करणार नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार असे घोषित केले आहे.

पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहेत. अभिनेता विजयने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याने आपल्या पक्षाचे नाव तमिलगा वेत्री कझगम  (टीव्हीके) असे ठेवले. त्यानंतर त्याने २०२६ च्या विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती देण्यासाठी अभिनेता विजयने मदुराईमध्ये आपल्या राजकीय पक्षाची भव्य रॅली आयोजित केली होती. यादरम्यान त्याने जनतेला संबोधित केले.

दरम्यान, माझा पक्ष तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढेल. जंगलात केवळ एकच शेर असतो आणि शेर हमेशा शेर होता है असा इशाराही अभिनेता विजयने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांना दिला आहे. १९६७ आणि १९७७ च्या निवडणुकीचा उल्लेख करत २०२६ मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल असेही तो आपल्या भाषणात म्हणाला. मी राजकारणात स्वत:चा बाजार उघडण्यासाठी आलो नाही तर लोकांची सेवा करायला आलोय असं विजयने यादरम्यान आरोळी ठोकली.

अभिनेता विजय यांनी भाजपाला फॅसिस्ट तर डिएमकेला विषारी संबोधले आहे. भाजपा आपला वैचारिक शत्रू तर डिएमके राजकीय शत्रू म्हणत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे.

टीव्हीके रॅलीत दुर्घटना

दरम्यान आज (२१ ऑगस्ट) झालेल्या मदुराई येथील तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) राज्य परिषदेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका समर्थकाचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकरन असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या रॅलीमध्ये हजारो समर्थक उपस्थित होते आणि २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून या भव्य रॅलीकडे पाहिले जात होते. यादरम्यान प्रभाकरन अचानक बेशुद्ध झाला, त्यानंतर त्याला जेव्हा रुग्णालयात नेले तेव्हापर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

Comments
Add Comment