Sunday, August 31, 2025

सरकारी नोकरीतील १ हजार १८९ ‘लाडक्या बहिणी' संकटात

सरकारी नोकरीतील १ हजार १८९ ‘लाडक्या बहिणी' संकटात

बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालकल्याणची विशेष पडताळणी मोहीम

मुंबई : गरीब आणि गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्यातील महायुती सरकारने गेल्या वर्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यातील काही लाभार्थी बोगस निघाले, तर पुरुषांनी देखील हातसफाई करून घेतल्याचे समोर आले. सरकारी नोकरीतील काही महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे खाल्ल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. ‘लाडकी बहीण योजने’तून बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत आयकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न तपासण्यात आले. त्यानुसार, अडीच लाखांहून अधिक उत्पन्न व चारचाकी गाडी असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले.

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी योजनेतून बाद ठरवण्यात आले. याच पडताळणीत २ हजार ६५२ महिला सरकारी सेवेत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा अहवाल संबंधित विभागांकडून मागवण्यात आला. सरकारी सेवेतील १ हजार १८९ महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले असून, उर्वरित महिलांबाबतचा अहवाल प्रलंबित असल्याचे महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment