
प्रशासन व एनडीआरएफ पथके सज्ज असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे जुन्या पुण्यातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेषतः मुठा, मुळा व पवना नदी पात्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.