
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना (शिंदे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कल्याणमध्ये राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे, ठाकरे गटाच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोळेगावचे सरपंच लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर आणि गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी ...
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी आमचे कौटुंबिक नाते आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे सर्वजण काम करतात." त्यांनी ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. "विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला ८० पैकी ६० जागा जिंकवून दिल्या, जे आमचे विरोधक शक्य नाही म्हणत होते. ‘ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. "जेव्हा ते निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब असतो. मात्र, बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती," असे सांगत त्यांनी ठाकरे गटाची कोंडी केली.
"मागील अडीच वर्षांत आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात आम्ही स्थगिती सरकारचे सर्व ‘स्पीडब्रेकर’ काढून टाकले, त्यामुळे जनतेने २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले," असे शिंदे म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.