
पुण्यातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. शहरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाहने आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. अनेक मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अपुरी पार्किंग व्यवस्था, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण मेट्रो प्रकल्प यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
एकेकाळी ‘विद्येचं माहेरघर' आणि सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आज वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या आणि वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेले दिसत आहे. शहराच्या विविध भागांत दररोज सकाळी व संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यासाठी प्रशासन, महापालिका प्रयत्नशील आहेत. वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी दीर्घकालीन उपयोजना आवश्यक आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आता आयटी कंपन्या पुण्यात आल्याने आयटीचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण झाली आहे. आयटी कंपन्या पुण्यात झाल्याने नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूप आहे. साहजिकच पुणे शहरावर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे शहर फुगत चालले आहे. त्याचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडत आहे. शहराच्या उपनगरांमध्येही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने उपनगरांमध्येही वाहनांची संख्या वाढत चालल्याने तिथलीही वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. सिंहगड रस्त्यावर नवीन उड्डाणपूल झाला असला तरी वाहतूक कोंडी अजूनही सुटलेली नाही. गेल्या काही वर्षांत पुण्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी मर्यादित असताना वाहनांची वाढती संख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची कमतरता यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतूक कोडींचे प्रमुख कारण आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले पाहिजे. खड्डेमुक्त रस्ते झाले तर बरीचशी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रस्त्यांना गर्दीचे प्रमाण वाढले आहे. लोक खरेदीसाठी येत असल्याने मध्यवर्ती भागातील पेठा, रस्ते गजबजले असतात. त्यामुळे तिथेही वाहतुकीचा वेग मंदावून लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
बससेवा अपुरी असल्याने आणि वेळेवर येत नसल्याने बस सेवेवर अजूनही विश्वास ठेवता येत नाही. जुन्या पुण्यातील रस्त्यांची रचना आजच्या ट्राफिकसाठी पुरेशी नाही. पुणे मेट्रोचे अनेक मार्ग अजूनही पूर्ण झालेले नाहीत आणि त्यामुळे शहरात विविध ठिकाणी खोदकाम सुरू असून ते वाहतुकीस अडथळा ठरत आहे. वाहतूक सुधारण्यासाठी अनेक घोषणा झाल्या; परंतु त्या प्रत्यक्षात कधीच आल्या नाहीत, अशा अनेक समस्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. बेशिस्त वाहनचालकामुळे पुणेकरांचा त्रास कायम आहे. वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळ वाया जात नाही, तर पेट्रोल-डिझेलचा खर्च, मानसिक ताण, अपघातांची शक्यता आणि वायुप्रदूषण या समस्यादेखील वाढत आहेत. आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. सार्वजनिक वाहतुकीचे जाळे मजबूत करणे, सायकल ट्रक, वॉकिंग प्लाझा यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायाला चालना देणे, ट्राफिक सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेराचा योग्य वापर करणे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करणे या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकते. २०२४ मध्ये तयार झालेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यांतर्गत रिंग रोड, मेट्रो आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० वर्षांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे प्रशासनही पुण्यातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी अॅक्शन मोडवर आहे. शहराच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेने पीएमआरडीच्या सीसीटीव्हीतील डेटा वापरण्याचा वेगळा प्रयोग सुरू करण्यात आला असून, देशात प्रथमच असा प्रयोग होत आहे. हा डेटा फॉरमॅट करून वापरण्यास योग्य करण्याचे काम वाहतूक पोलीसांनी सुरू केले आहे. यामुळेही वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे उड्डाणपुलाचे संरेखन बदलण्याची गरज भासल्यास MSRDCला सरकारची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहने अधिक सुलभतेने प्रवास करू शकतील. दररोज होणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वेळ आणि इंधन वाया जाते. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हडपसर ते यवत दरम्यान २५ किलोमीटर लांब उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर उभारला जाईल. या उड्डाणपुलामुळे हडपसर, उरळी कांचन, लोणीकंद, यवत आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. पुण्याच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधणे हे प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाचेंही कर्तव्य आहे. अन्यथा, वाढत्या वाहनांसोबत ही कोंडी अधिकच भयानक स्वरूप धारण करेल. वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय आणि कठोर उपाययोजनांची गरज आहे.- प्रतिनिधी