
मुंबई: मुंबईसह राज्यभरात सोमवारपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे काही नावच घेत नाही. मंगळवारी मुंबईची अक्षऱश: तुंबई झाली होती. सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. लोकल वाहतूक ठप्प झाली. मोनोरेलमध्येच अडकली. अनेक प्रवाशांचे मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत.
त्यातच बुधवारीही पावसाने आकाशात काळे ढग जमा झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. अजूनही लोकल वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. रात्रीपर्यंत ही वाहतूक विस्कळीतच होती.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाने थोडीफार विश्रांती घेतली होती. मात्र पहाटेपासून पुन्हा पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी केली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने बुधवारीही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे.
कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून विसर्ग सुरू
बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणांपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मोडकसागरमधून २५१११ क्युसेक, तर तानसा धरणातून ३८६८४.१० क्युसेक आणि मध्य वैतरणा येथून १४८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तळकोकणात पावसाचा धुमाकूळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोरदार मारा पाहायला मिळत आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढल्याने ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.