
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. १२०५१ मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि २१ ऑगस्ट रोजी मडगावहून सुटणारी २२२३० मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करत ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस जी आज पहाटे १२:०५ वाजता सुटणार होती, ती आता रात्री ११:०० वाजता पुन्हा वेळापत्रकानुसार सोडली जाईल. प्रवासाच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. १२६१९ लोकमान्य टिळक-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस आता पनवेल स्टेशनहून सुटेल, तर १०११५ वांद्रे-मडगाव एक्सप्रेस कामण रोड स्टेशनहून सुटेल.
वांद्रे ते कामण रोड दरम्यानचा तिचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा चौकशी केंद्रावर माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.