
आळंदी : मुसळधार पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराच्या दिशेने जाणारा भक्ती-सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढतच चालला आहे, नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी घाटावर आले आहे तसेच मंदिराच्या परिसरात शिरले आहे. मंदिरात जात असलेल्या भाविकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीकिनारी असलेले केजुबाई मंदिर पाण्याखाली गेले आहे. पवना धरणातून पंधरा हजार सातशे मिलिमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू आहे. पवनेचे पाणी चिंचवडचे ग्रामदैवत असलेल्या मोरया गणपतीच्या भेटीला आले आहे.