Tuesday, August 19, 2025

आत्महत्यांचे वाढते प्रमाण

आत्महत्यांचे वाढते प्रमाण

आत्महत्या या गंभीर आणि संवेदनशील विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत, हे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे आणि यामागे अनेक जटिल कारणे आहेत. या समस्येला समजून घेण्यासाठी आपण विविध पैलूंवर सविस्तर जाणून घेणे गरजेचे आहे. आत्महत्येचे वाढते प्रमाण त्याची कारणे आणि पार्श्वभूमी पाहिली असता लक्षात येते की, आत्महत्या फक्त एकाच कारणाने होत नाही. ती अनेक मानसिक, सामाजिक आणि जैविक घटकांचा परिणाम असते.


काही प्रमुख कारणे जसे की मानसिक आरोग्याच्या समस्या, नैराश्य, चिंता, द्विध्रुवी विकार, सिझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आजार आत्महत्येमागे सर्वात मोठे कारण आहेत. नैराश्यामध्ये व्यक्तीला निराशा, उदासी आणि भविष्याबद्दल नकारात्मकता वाटते, ज्यामुळे जगण्याची इच्छा कमी होते. अश्या आजारावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर व्यक्ती आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलतो. सामाजिक आणि आर्थिक दबाव जसे की बेरोजगारी, आर्थिक नुकसान, कर्ज, कुटुंबातील समस्या, घटस्फोट, नातेसंबंधांमधील तणाव आणि सामाजिक बहिष्कृतता यामुळे व्यक्तीवर प्रचंड मानसिक दबाव येतो. आपण समाजाचा घटक म्हणून जगण्यास लायक नाही आहोत, आपल्यात उणीव, कमतरता आहे या नकारात्मक विचारांनी व्यक्ती घेरली जाते आणि आपल्या आयुष्यात, जिवंत राहण्यात काहीच अर्थ नाही अशी त्याची मनोमन खात्री होते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक एकटे पडले आहेत, कुटुंब विभक्त झाली आहेत, जग व्यावहारिक झाले आहे, माणुसकी नावाला उरली आहे. अशावेळी ज्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी कोणीही नसते त्यावेळी घुसमट होऊन, मनातील दुःख, वेदना, अपेक्षा कोणालाच सांगू न शकल्याने या व्यक्ती आतून पूर्ण तुटलेल्या असतात आणि त्यातून त्या स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतात.


शारीरिक आजार हे सुद्धा आत्महत्या करण्यामागील एक सबळ कारण आहे. गंभीर आणि दीर्घकाळ चालणारे शारीरिक आजार ज्यामुळे व्यक्ती हताश होऊ शकते आणि आत्महत्येचा विचार करू शकते. आपण सतत वैद्यकीय मदतीच्या आधारे जगत आहोत, आपण कुटुंबातील लोकांसाठी ओझं आहोत, आपल्याला प्रत्येक हालचालींसाठी कोणावर अवलंबून आहोत हे स्वीकारणे अत्यंत कठीण असते. अनेकदा अशा आजारी व्यक्ती समाजाकडून, कुटुंबातील लोकांकडून झिडकारल्या जातात, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट दिली जात नाही, त्यांना पूर्ण बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत त्यामुळे अशा व्यक्ती रुग्ण म्हणून आयुष्य काढण्यापेक्षा मेलेले बरे या नैराश्यातून स्वतःला संपवतात.


वयोवृद्ध व्यक्ती ज्या आजारी पण आहेत, मुलं बाळं लक्ष देत नाहीत, इलाजासाठी पैसे नाहीत, अंथरुणाला खिळून आहेत त्यांना खूप मानसिक वेदनांना सामोरे जावे लागते. व्यसनाधीनतासुद्धा व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करते. अनेकदा नशेत असतांना, स्वतःवरील संयम गेल्यामुळे, अती रागात, अती भावनेच्या भरात, गैरसमज होऊन, तर कधी कोणत्याही भांडणाचा राग अती प्रमाणात आल्यामुळे, आत्महत्या केल्या जातात. नशेमध्ये आधीच व्यक्ती मेंदू आणि मनावरील ताबा गमावून बसलेली असते त्यावेळी त्याला आत्महत्यापर्यंत न्यायला कोणतेही कारण पुरेसे ठरते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ही व्यक्ती सहसा अनेक भावना आणि विचारांमधून जात असते. असह्य वेदना म्हणजेच त्यांना वाटणारी मानसिक आणि भावनिक वेदना इतकी तीव्र असते की ती सहन करण्यापलीकडे जाते. त्यांना असे वाटते की या वेदना थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवन संपवणे. कोणत्याही गोष्टीचा खूप मोठा आघात जेव्हा व्यक्तीवर अनपेक्षितपणे होतो, मनात जे योजले त्यापेक्षा भलतंच काही घडतं तेव्हा ती व्यक्ती खूप वेदनेमधून जातं असते परिणामी त्यावेळी तिला सावरणारे, समजून घेणारे कोणी उपलब्ध नसल्यास ती आत्महत्या हा पर्याय निवडते. निराशा आणि हताशता, म्हणजेच भविष्यात काहीही चांगले घडणार नाही, आता सगळं संपलं अशी त्यांची खात्री झालेली असते. त्यांना वाटते की परिस्थितीत कधीच सुधारणा होणार नाही आणि आहे या परिस्थितीमध्ये मी जगू शकत नाही, ही परिस्थिती मी स्वीकारू शकत नाही, यातून काहीच मार्ग शिल्लक नाही. ओझ्याची भावना येऊन व्यक्तीला असे वाटू लागते की ते त्यांच्या कुटुंबासाठी किंवा इतरांसाठी ओझे झाले आहेत. ‘माझ्यामुळे इतरांना त्रास होतोय’ ही भावना त्यांच्या मनात घर करते. विचारांची संकुचितता म्हणजे आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला हा एकच मार्ग दिसतो. त्यांना इतर कोणताही पर्याय दिसत नाही. त्यांच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी त्या सोडवता येऊ शकतात, हे त्यांना जाणवत नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की ही व्यक्ती मरू इच्छित नाही, तर त्यांच्या वेदना थांबवू इच्छिते. समस्या हळूहळू सुटतात त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न, खूप संयमी वृत्ती, दूरदृष्टी आणि स्वतःशी स्वतःकडूनच झालेल्या चुकांबद्दल संवाद साधने, इतरांसमोर चुका कबूल करणे, आत्मपरीक्षण करणे उपयुक्त असते. जी व्यक्ती यासाठी कमी पडते ती कठीण परिस्थितीसमोर हार मानून आत्महत्या करते.


आत्महत्येमागील मानसशास्त्रीय कारणे जाणून घेणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. मानसशास्त्रानुसार, आत्महत्येचा विचार करण्यामागे काही विशिष्ट मानसशास्त्रीय प्रक्रिया कार्यरत असतात. उदा. ‘मी अपयशी आहे’, ‘माझ्यासोबत नेहमीच वाईट घडते’, ‘कोणीही मला मदत करू शकत नाही’ असे विचार त्यांच्या मनात येतात. जेव्हा एखादी व्यक्ती सतत नकारात्मक भावना अनुभवते, तेव्हा ती हताश होऊन आत्महत्येचा विचार करू शकते. जेनेटिक्स आणि न्यूरोबायोलॉजी याचा अर्थ काही संशोधनानुसार, आत्महत्येची प्रवृत्ती आनुवंशिक असू शकते. मेंदूमधील सेरोटोनिनसारख्या रसायनांची पातळी कमी असल्यास नैराश्य आणि आत्महत्येचा धोका वाढू शकतो. स्वतःच्या नशिबाला दोष देणे, इतरांकडून सतत अवहेलना अपमान होत राहणे, स्वतःवरील अविश्वास, भविष्याची अती चिंता, सतत नकारात्मक लोकांमध्ये राहून तयार झालेली निगेटिव्हीटी, घडलेल्या गोष्टींवर सतत पच्छाताप करणे, स्वतःला दोषी समजणे या गोष्टी आत्महत्या करण्यासाठी मजबूर करतात. आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना आजमितीला काळाची गरज आहे. आत्महत्या थांबवणे शक्य आहे, पण त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. वैयक्तिक स्तरावर मदत मागणे सर्वात महत्त्वाचे आहे. मानसिक वेदना होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधा. आपल्या आयुष्यातील सर्व घटना त्यांना स्पष्ट आणि सत्य स्वरूपात सांगा, कुठेही आडपडदा न ठेवता व्यक्त व्हाल तेव्हाच कोणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल. अनेक संस्था आत्महत्येचा विचार करणाऱ्यांसाठी २४/७ हेल्पलाइन चालवतात. तिथे बोलल्याने खूप मदत मिळते, मान, भावनिक आधार मिळतो. सामाजिक स्तरावर संवाद साधणे आणि लक्ष देणे म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी उदास असेल किंवा कोणाला एकटे वाटत असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की ‘तुम्ही ठीक आहात का?’ स्वतः पुढाकार घेऊन अशा व्यक्तींना बोलतं करणे, आपुलकी, काळजी दाखवणे अपेक्षित आहे. आपले असे वागणे त्यांना आत्मविश्वास देते.


शारीरिक आजार दिसून येतात, त्यावर उघडपणे बोलले जाते, अनेक सल्ले दिले जातात. मानसिक आजार म्हणजे वेड लागणे असा गैरसमज सगळीकडे दिसतो. मानस उपचारतज्ज्ञांकडे जाताना भीती, दडपण असते. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्याचे कार्यक्रम आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक तरुण मुलांमुलींच्या घरी सुशिक्षित पालक, मोकळ वातावरण, कोणत्याही विषयावर बोलण्याची हिंमत व्हावी असे लोक नसतात. मुलांबरोबर सर्व प्रकारचा संवाद साधतील इतका वेळ अनेक पालकांना नसतो. सातत्याने पालकांनी व्यस्त असणे, त्यांची इतर मुलांशी तुलना करणे यातून मुलं खूप दुखावली जातात. अनेकदा घरातील वादग्रस्त वातावरणामुळे तरुण मुले कंटाळून, हतबल होऊन आत्महत्या करतात. आत्महत्या कमी करण्यासाठी मदत केंद्रांची उपलब्धता शहरांमध्ये आणि गावांमध्ये होणे अनिवार्य आहे. शासन आणि आरोग्य सेवा स्तरावर अशी केंद्र चालविली जाणे अपेक्षित आहे. मानसिक आरोग्य सेवा शहरी भागांपुरत्या मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात पोहोचवणे अपेक्षित आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला आत्महत्येचा विचार येत असेल, तर लगेच मदत घ्या. हे लक्षात ठेवा की, आत्महत्येचा विचार तात्पुरता असतो; परंतु जीवन मौल्यवान आहे. परिस्थितीत बदल होतो आणि मदत घेऊन आपण त्यातून बाहेर पडू शकतो. समस्या, तणाव, त्रास प्रत्येकाला आहेत. त्रासाचे स्वरूप वेगळे असते पण सगळ्याच बाबतीत सुखी, आनंदी, पूर्ण समाधानी असे कोणीच नसते. आपल्या आजूबाजूला पहिल्यास लक्षात येते की, आपल्यापेक्षा पण त्रासातून जाणारी लोकं आहेत, रोज संघर्ष करणारी लोकं आहेत. अनेकदा वरवर पाहताना आपल्याला वाटते इतर लोकं किती नशीबवान आहेत, यांना कोणताही त्रास नाही टेंशन नाही पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आव्हाने कायमच असणार आहेत. पण आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन त्यावर मात करणे, सत्याची कास धरून, मेहनत, जिद्द, चिकाटी यांची जोपासना करून नीतिमत्तेला आधारित आनंदी, उत्साही, निरोगी जीवन जगणे आपल्याच हातात आहे. - मीनाक्षी जगदाळे

Comments
Add Comment