
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे . खोखरा येथील सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यावर एका आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला . एका किरकोळ वादातून हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे . या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेत घुसून साहित्याची तोडफोड केली व आंदोलन केले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेने केल्याचा आरोप पालकांनी केला आहे .
मृत विद्यार्थी त्याच्या चुलत भावासोबत सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकत होता. शाळा सुटल्यानंतर दोघेही पायऱ्या उतरत असताना त्याचे आठवीच्या विद्यार्थ्याशी भांडण झाले. भांडण इतके वाढले की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि समोरच्या मुलावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी मुस्लिम विद्यार्थ्याला अटक केली आहे आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांचे जबाब देखील घेतले आहेत.
पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार हा हल्ला झाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्वरित जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले नाही. सुमारे अर्धा तास हा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . एकही शिक्षक किंवा कर्मचारी त्याठिकाणी आले नाहीत . पीडित विद्यार्थ्याच्या मित्रांनी त्याला ऑटोरिक्षातून दवाखान्यात नेले . पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . या घटनेननंतर शाळेने खून झालेल्या ठिकाणी रक्त टँकरच्या साहाय्याने पाणी मागवून धुवून टाकले असेही या जबाबात म्हटले आहे .
घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . त्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली. संतप्त पालकांनी शाळेची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला . अनेक पालकांनी आरोप केला की, काही विद्यार्थी शाळेत शस्त्रे आणि ड्रग्जसारख्या वस्तू आणत असतात. त्यांच्यावर शाळा प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.